spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांना कोणी रडवलं?

राज्याच्या इतिहासात आलेल्या सगळ्यात मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात केली. त्याचवेळी फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगत विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी शिंदे सरकारवर मार्गदर्शनपर कंट्रोल ठेवणार असल्याचे सांगितलं.

राज्याच्या इतिहासात आलेल्या सगळ्यात मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात केली. त्याचवेळी फडणवीस यांनी आपण मंत्रिमंडळात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगत विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी शिंदे सरकारवर मार्गदर्शनपर कंट्रोल ठेवणार असल्याचे सांगितलं. त्यांच्या या निर्णयाने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातही खूप मोठे तरंग उमटले. त्यानंतर झपाट्याने सूत्रे हलली.
सर्वात वजनदार आवाजाचा एक फोन दिल्लीहून आला आणि कॅप्टन असलेले देवेंद्र फडणवीस व्हाईस कॅप्टन झाले. देवेंद्र यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराष्ट्राचा देशाच्या राजकारणात काय चाललंय याच्याबद्दल राजकीय समीक्षकांनी काथ्याकुट सुरू केला.

गुरुवारी संध्याकाळी साडेचार च्या सुमारास राजभवन मध्ये देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह पत्रकार परिषदेसाठी दाखल झाले. तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. २० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बंडखोर गटासह एकनाथ शिंदे भाजपला पाठिंबा देऊन किंवा सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री बनतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असतील याची सगळ्यांनीच खूणगाठ बांधली होती. गुरुवारी संध्याकाळी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला 440 नव्हे तर ४४०० होल्डचा शॉक मिळाला. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री असतील आणि भाजप त्यांना पूर्णतः पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होईल असे सांगितले. त्याचवेळी मी स्वतः व्यक्तिशः मंत्रिमंडळात नसेल असे सांगून फडणवीस म्हणाले, ‘सरकारला विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी लागणारे मार्गदर्शन मी सरकार बाहेरून करणार आहे’. ही घोषणा केलेली पत्रकार परिषद सुरू असताना टीम देवेंद्र यांच्याबरोबर पत्रकार परिषदेत बसलेला एक नेता या निर्णयामुळे कमालीचा सुखावलेला होता. त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. माध्यमांमधल्या काही मित्रांकडे आणि स्नेह्यांकडे बघत हा नेता आपला आनंद व्यक्त करत होता. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला धक्का देणारी ही पत्रकार परिषद संपवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या ‘सागर’ या निवासस्थानी गेले. तिथे राज्यातील निवडक नेत्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये फडणवीस यांनी आपण घेतलेल्या निर्णयाचे कंगोरे सहकाऱ्यांना विस्तृतपणे समजवण्यास सुरुवात केली. बैठकीत गंभीर चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतल्या एका तरुण नेत्याने माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष जीपी नड्डा हे माध्यमांसमोर विवेचन करत असल्याचं भाजप नेत्यांना सांगितलं. हा तरुण नेता अत्यंत अभ्यासू आणि माध्यमस्नेही आहे. फडणवीस यांच्या ऐवजी मुख्यमंत्री पदासाठी हा नेता दिल्लीश्वरांची पसंती ठरेल अशी अटकळ बांधली जात होती. याच नेत्याने नड्डांच्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल सांगितल्या नंतर लगेचच हॉलमधील टिव्हीवर राष्ट्रीय चॅनेल सुरु करण्यात आला. त्यावेळी जेपी नड्डा देवेंद्र फडणवीस हे शिंदे सरकार मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन उपमुख्यमंत्री बनतील असं विषद करत होते. फडणवीस हे सरकारला बाहेरून कंट्रोल करणार नाहीत तर प्रत्यक्ष शिंदे सरकारचा भाग असतील असं नड्डा यांनी सांगितल्यानंतर बैठकीतले भाजप नेते गडबडून गेले. फडणवीस यांना तर काय बोलावं हेच सुचेना. ते हॉलमधून उठून लगेच एका आतल्या खोलीत गेले आणि काही क्षण निशब्द झाले. फडणवीस बैठकीतून अचानक उठून गेल्याचे पाहिल्यानंतर भाजप मधली काही ज्येष्ठ नेतेमंडळी त्या खोलीत शिरली. त्यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रविण दरेकर आणि चंद्रकांत पाटील आदी नेत्यांचा समावेश होता. काय बोलावं हे कोणालाच कळत नव्हतं. त्याच क्षणी देवेंद्र फडणवीस यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. चेहरा पडला होता. एकूणच घडलेला प्रकार फडणवीस यांच्या लक्षात येताच आपण नेता आहोत याचं भान राखत त्यांनी स्वतःला सावरलं आणि डोळ्यात आलेलं पाणी हलकेच टिपून ते पुन्हा बैठकीच्या ठिकाणी आले. आपण उपमुख्यमंत्री होणार नाही असं त्यांनी बैठकीतल्या नेत्यांना आत्मविश्वासपूर्वक सांगितलं.त्यानंतर त्यांना जीपी नड्डा यांचा फोन आला. त्यांनी या संदर्भातले पक्षाचे आदेश फडणवीस यांना कळवले.तरी फडणवीस तयार होत नाहीत ही गोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या लक्षात आली. फडणवीस हे नड्डा यांना त्यांचं बाहेर राहणं कसं योग्य आहे हे विनंती वजा समजावून सांगत होते. नड्डा यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर काही मिनिटात दिल्लीतून एका वजनदार नेत्याचा फोन आला. भारदस्त आवाजातल्या या नेत्याने फडणवीस यांना शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याचे थेट आदेशच दिले. त्यानंतर गेले दहा दिवस सुरू असलेल्या राज्याच्या राजकारणातल्या भूकंपाच्या श्रुंखलेतला नवा भूकंप झाला.
देशातील मोजक्या बुद्धिमान, वाकचातुर्य, प्रशासकीय कौशल्य असलेल्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होतो. त्यांना एकनाथ शिंदे सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ बनायचं होतं. मात्र भाजप मधल्या श्रेष्ठींनी त्यांची राजकीय ‘रिमोट कंट्रोल’ बनण्याची खेळी उधळूण लावली. गेल्या अनेक वर्षात राज्यात सलग पाच वर्ष मुख्यमंत्री बनण्याची किमया कोणालाही साध्य करता आली नव्हती. अगदी शरद पवारही ही गोष्ट साधू शकले नव्हते. ती गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली होती. मात्र त्याच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्री बनवणारा जो सगळा खेळ दिल्लीश्वरांनी मांडला. त्यातला बॅट्समन फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत पहिल्या रांगेत बसलेला होता. पहिल्या रांगेतील नेत्यांपैकी फडणवीसांचा ‘खेला होबे’ कोणी केला? यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Latest Posts

Don't Miss