Saturday, September 28, 2024

Latest Posts

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे खास सुविधा; आता तीन टप्प्यात भरता येणार रक्कम

१९७ लाभार्थ्यांना सदनिकेची एकूण किंमत तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

म्हाडाच्या घराची (Mhada Home ) रक्कम आता तीन टप्प्यांत भरता येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे (konkan mandal of mhada ) ग्राहकांना ही खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे २०१८ आणि त्यापूर्वी काढलेल्या सदनिका सोडतींमधील मौजे बाळकुम-ठाणे या गृहनिर्माण योजनेतील १९७ लाभार्थ्यांना सदनिकेची एकूण किंमत तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. म्हाडाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

कोकण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या या सुविधे अंतर्गत या योजनेतील लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात सदनिकेच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत भरायची आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्के रक्कम ३१ जानेवारी २०२३ पर्यंत भरायची आहे. तसेच तिसऱ्या टप्प्याअंतर्गत उर्वरित २५ टक्के रक्कम भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांत वितरणपत्रामधील अटी शर्तींच्या अधिन राहून भरणे लाभार्थ्यांना बंधनकारक आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतील लाभार्थ्यांनी मंडळाकडे केलेल्या मागणीनुसार आणि सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा सुलभ, मुदतीत होण्यासाठी मौजे बाळकुम-ठाणे येथील विजेते व देकार पत्र प्राप्त विजेत्यांनी सदनिकेच्या एकूण किंमतीच्या दहा टक्के रकमेचा भरणा केल्यानंतर कोकण मंडळामार्फत सदनिकेची उर्वरित ९० टक्के रक्कम बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून गृह कर्ज स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सोडतीच्या नियमानुसार देकार पत्र मिळाल्यापासून ४५ दिवसांत सदनिकेच्या एकूण किंमतीच्या दहा टक्के रक्कम आणि त्यानंतर ६० दिवसांत ९० टक्के रक्कम भरून घेतली जाते. मात्र, मौजे बाळकूम-ठाणे गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळं या शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांना धूसर वाटतं. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं.

हे ही वाचा:

भारतात लवकरच सुरू होणार 5G सेवा; १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

RBI च्या रेपो रेट वाढीच्या घोषणेनंतर का वाढतेय बँकिंग स्टॉक्समधील गुंतवणूक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss