spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्तारांच्या भाषणावेळीच कार्यकर्ते निघाले; चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली

आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकरणामध्ये आरोप प्रत्यारोपचा खेळ रंगला होता. शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उमटली आहे. अशातच सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या औरंगाबादमधील सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा दावा सत्तारांनी केला होता. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने सत्तारांच्या दाव्यातली हवा निघाली आणि चालू भाषणातच खुर्च्या उचलण्याची वेळ आली.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे भाषण करणार आहेत. या सभेला लाखो श्रोत्यांची उपस्थिती असेल, असं सत्तारांनी बेटकुळ्या फुगवून सांगितलं होतं. मात्र सत्तारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. कारण या सभेला सत्तारांच्या अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमा झाली. मैदान भरलं नाही म्हणून चालू भाषणातच मांडलेल्या खुर्च्या उचलण्याची वेळ आली. भाषणावेळी रिकाम्या खुर्च्या कोणाच्या नजरेत भरु नयेत, यासाठी भाषणं सुरु असतानाच खुर्च्या उचलून बाजूला ठेवण्यात आल्या. विशेष म्हणजे चालू सभेतून लोक जात असताना मंत्री सत्तार यांनी मंचावरुनच आदेश दिले, की सभा संपेपर्यंत कुणीही जाऊ नये.

शिंदे गाटाचे नेते अब्दुल सत्तार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने नवा वाद पेटला आहे. सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन करत सत्तारांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला जात आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यांच्या ट्विटर हँडलवरूनही एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यासोबत त्यांनी लिहीले आहे की, “या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहेत. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तवणुकीमुळे उघडे पडले आहेत,” “या आधी ‘स्वयंपाकघरात जाऊन काम कर’ हे विधान असो किंवा विद्यमान मंत्र्याचे सध्याचे विधान. हे असे लोक आहेत जे आमदार आणि ‘नव्या’ पुरोगामी सरकारचा भाग असल्याचा दावा करतात..” असे सदानंद सुळे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपाई विधानानंतर एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘टाईम महाराष्ट्र’ कडून सुवर्ण संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss