spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Eknath Shinde : साईबाबा मला सांभाळा असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘कारण’

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांची जीवघेणी धावपळ सुरू आहे. बरोबरच्या चाळीस आमदारांची मर्जी राखण्याच्या प्रयत्नात आणि आलेल्या प्रत्येकाला खुष करण्याच्या ओढाताणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय शिस्तीचे कडबोळं करताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत वर्षा बंगल्यावर अक्षरश: ‘बाबा का भंडारा’ अशा स्वरूपाचा माहौल बनवला आहे. त्यामुळे ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांपासून ते भाजप नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच मुख्यमंत्र्यांची चिंता वाटू लागली आहे. या सगळ्या तणावापासून मनःशांती मिळवण्याकरता मुख्यमंत्र्यांनी बुधवारी अचानक शिर्डीच्या साईबाबांचे सपत्नीक दर्शन घेऊन या अडचणींपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपलं इष्टदैवत असलेल्या साईंनाच साकडं घातलं.

शिवसेनेमध्ये उठाव करत ४० आमदारांना घेऊन मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या चाळीस आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांच्या मर्जी साठी दिवस-रात्र एक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मध्यरात्री तीन वाजता बेडरूम मध्ये जाणारे मुख्यमंत्री सकाळच्या शासकीय कार्यक्रमांसाठी आणि बैठकांसाठी लवकर तयार होण्याचा प्रयत्न करतात मात्र काही नेमके अपवाद वगळता कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे वेळेवर पोचू शकत नाहीत.भाजप सेना युतीचे सरकार असताना ९० च्या दशकात उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे अशाच पद्धतीत वेळी अवेळी कार्यक्रमांना पोहोचत होते. मात्र त्यावेळी समाजमाध्यमांचा इतका सुळसुळाट नसल्यामुळे फक्त वर्तमानपत्रांतूनच लोकनेते मुंडेंवर टीका होत होती. आता मात्र समाज माध्यमांचा ससेमीरा पाठीशी असतानाही मुख्यमंत्री शिंदे आपल्याबरोबरच्या ५० आमदारांना सुखावण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीचे,सुरक्षेचे आणि प्रशासकीय शिस्तीचे बारा वाजवत आहेत. मुख्यमंत्र्यांना सुरुवातीपासून साथ देणाऱ्या आमदारांनी संपूर्ण राज्यभरात बेताल वक्तव्य, दमबाजी आणि झुंडशाहीने धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा : 

Watch video : ‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल, व्हिडीओमध्ये पाहा

मुख्यमंत्री शिंदेंकडून कामं करून घेण्याच्या लालसेपायी शनिवारी रविवारी देखील मतदार संघात न फिरकणाऱ्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना जेरीस आणलेलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बिचकत जाणारे हे आमदार सध्या एकाच वेळी ३० ते ४० कामांचे प्रस्ताव गठ्ठागठ्याने घेऊन येतात. आणि मुख्यमंत्री शिंदे अँटीचेंबर पासून ते गार्डन पर्यंत जिथे असतील तिथे त्यांच्या पत्रांवर सह्या करण्यात धन्यता मानतात. अशाने कोणत्या पत्रावर आपण सही करतोय याकडेही मुख्यमंत्र्यांचे पुरेसं लक्ष नसतं ही गोष्ट मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अडचणीची ठरू शकेल अशी भीती एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने बोलून दाखवली. कारण पहिल्या दोन, चार सह्या करेपर्यंत सर्वसामान्य माणूस पत्र वाचू शकतो. मात्र त्यानंतरच्या पत्रांवर होणाऱ्या सह्यांमुळे कदाचित मुख्यमंत्र्यांवर आफत ओढवू शकते.

शिंदेंबरोबर असलेल्या रायगड मधल्या एका मनगटशाहीचा पुरस्कार करणाऱ्या आमदाराने एकाच वेळी २१ तहसीलदारांच्या बदलीचा ‘विडा’ उचलला आहे. त्यामुळे इतर आमदार नाराज आहेत. या आमदार महोदयांच्या मुलाने स्वतःला भावी आमदार समजत सुरू केलेल्या वादग्रस्त कामांची जंत्री ही कोकण विभागात चर्चेचा विषय ठरत आहे. तर मुंबईतील एका बड्या दाक्षिणात्य बिल्डरच्या हिताचा ‘सदा’ ध्यास घेतलेल्या एका आमदाराने झोपडपट्टी पुनविकास मंडळात (एसआरए) उपमुख्य अभियंता वर्ग एक पदावर एका वादग्रस्त अधिकाऱ्याला तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. यासाठी छाती दडपेल इतक्या मोठ्या प्रमाणात ‘स्नेहमिठी’ झाल्याचा विषय चवीचवीने बांधकाम क्षेत्रात चघळला जात आहे. हे मंडळ निर्माण झाल्यापासून ही पहिली वादग्रस्त मुदतवाढ मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. गेली तीन वर्षापेक्षा अधिक काळ एसआरए मध्ये ‘मिटक्या’ मारणाऱ्या या अधिकाऱ्यामुळे नियमाप्रमाणे या पदावर बदली करण्यात आलेल्या एका ज्येष्ठ अभियंत्याला अक्षरश: बळजबरीने ठाण्याच्या दिशेने हुसकावून लावण्यात आलेलं आहे.

Vikram Gokhale : ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, कृपया अफवा पसरवू नये’, गोखले कुटुंबीयांचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रं आल्यानंतर जाहीरपणे आपल्या बेताल वक्तव्याने पश्चिम उपनगरातील पोलीस खात्यावर आपला दिव्य ‘प्रकाश’ टाकणाऱ्या एका वादग्रस्त आमदाराने मुंबईतील परिमंडळ १२ मध्ये आपल्या पसंतीचे उपायुक्त मिळवल्यानंतर आता सहआयुक्ततांसाठीही आणि काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी दमदार ‘बोली’ लावत कंबर कसली आहे. याबाबत आयुक्त स्तरावरील एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त करत पोलीस दलातील नाराजीची, प्रक्षोभाची शक्यता बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांसाठी शिंदे तात्काळ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून कामं करण्याचे आदेश देतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी अक्षरश: प्रशासनाला वेठीला धरलं आहे. इतकंच नव्हे तर या आमदारांपैकी बरेचसे लोकप्रतिनिधी अनेकदा मुख्यमंत्र्यांना आपली कामे अडलेल्या संबंधित व्यावसायिकांना किंवा खाजगी व्यक्तींना स्वतःच्या फोनवरून संपर्क करून सूचना द्यायला भाग पाडतात.

मुख्यमंत्र्यांबरोबर गेलेल्या ५० आमदारांपैकी बहुतांश आमदार हे वादग्रस्त पार्श्वभूमीचे असल्यामुळे नजीकच्या काळात मुख्यमंत्री एखाद्या मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता ही याच आमदारांपैकी एक असलेल्या उच्चशिक्षित आमदाराने बोलून दाखवली. या आमदारांनी ‘वर्षा’वर धडकताना आपल्याबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणायला पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी बंगल्याची पार रया घालवण्याकडेच अनेकांचा कल असतो. आलेले जवळपास सगळे कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे तासन्तास मुख्यमंत्र्यांसमोरची गर्दी कमी होत नाही. मध्यरात्री तीन -चार वाजेपर्यंत अभ्यागतांना मुख्यमंत्री भेटत असतात. विभागीय पातळीवरचे छोट्या- छोट्या कार्यक्रमाची निमंत्रण घेऊन हे समर्थक आमदार मुख्यमंत्र्यांना भावनिकदृष्ट्या वेठीस धरत असतात. हे ४० शिवसेनेचे आमदार शिवसेनेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना अत्यंत कस्पटासमान वागवत होते. महिनो महिने भेट न मिळणाऱ्या या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अन्न-पाणी आणि औषधे आणि आपल्या लाडक्या नातवासाठीही वेळ काढू देत नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातील ज्येष्ठ अधिकारी सांगतात.

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा; शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अति महत्त्वाच्या व्यक्ती बसण्याच्या दालनामध्ये एक सुपर ‘ॲण्टीचेंबर’ बनवण्यात आलं आहे. या सुपर ‘ॲण्टीचेंबर’ला लागूनच एक प्रसाधनगृह मुख्यमंत्र्यांसाठी बनवण्यात आलेलं आहे. अनेक आमदार आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे ग्रामीण भागातले राजकीय समर्थक कुठलीच तमा न बाळगता मुख्यमंत्र्यांचं वैयक्तिक प्रसाधनगृह वापरतानाही परवानगी घेत नाहीत. हा प्रकार वीस वर्ष वेगळी वेगळी मंत्रीपद भूषवलेल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समोर घडल्यानंतर त्यांनी अक्षरशः डोक्यावर हात मारून घेतला. मुख्यमंत्र्यांकडची तोबा गर्दी आणि त्यांच्या वेळेच्या बिघडलेल्या गणितावर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंना माजी मुख्यमंत्री विलासरावांचा आदर्श ठेवावा लागेल. अत्यंत नेमस्तपणे वागणारे विलासराव तितकेच मोठे लोकनेते होते. सकाळी नऊ वाजल्यापासून कामकाजाला सुरुवात करणारे विलासराव सकाळच्या पहिल्या ५० मिनिटांत आमदार, खासदार आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून मंत्रालयाच्या दिशेने निघायचे.

सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत शासकीय कामे आणि प्रशासकीय बैठका मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उरकून ते दुपारी जेवणासाठी घरी पोहोचायचे. त्यानंतर जेवून विश्रांती करणारे स्वर्गीय विलासराव संध्याकाळच्या सार्वजनिक आणि पक्षीय कार्यक्रमासाठी सज्ज व्हायचे. रात्री दहा वाजता ‘वर्षा’वर कुणीही उपस्थित असले तरी त्या प्रत्येकाला दुसऱ्या दिवशी येण्याच्या सूचना देत ते आपल्या शयनगृहाकडे निघून जायचे. असं सांगून पाटील म्हणाले, लोकांची कामं करणारा लोकनेता लोकांना हवाच असतो. पण त्या नेत्याने स्वतःच्या प्रकृतीची काळजीही स्वतःच घ्यायला हवी. कारण लोकांची गर्दी आणि कामे ही कधीच संपणारी नसतात. शिवाय मुख्यमंत्री पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला सतत जागरूक राहून निर्णय घ्यावे लागतात. कारण त्यांचा एक निर्णय राज्यासाठी दूरगामी परिणाम करणारा असतो. त्यामुळे शिंदेंनी आपले शरीर आणि मन तजेलदार ठेवण्यासाठी वेळीच सकारात्मक विचार करायला हवा.

Hill Station : हनीमूनला जाण्याचा प्लॅन करताय ? तर या ठिकाण्याचा नक्की विचार करा

समर्थक आमदारांकडून आलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचं या अट्टाहासामुळे मुख्यमंत्र्यांना कोणत्याच कार्यक्रमाच्या अचूक वेळा पाळता येत नाहीयेत. कारण प्रमाणापेक्षा अधिक कार्यक्रम घेणारे एकनाथ शिंदे बहुतेक कार्यक्रमांना किमान दोन ते तीन तास उशिरा पोहोचत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. त्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री जिथे कार्यक्रमाला जातात तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हालाला पारावार उरलेला नाही. मुख्यमंत्र्यांकडे जाणाऱ्या कामांच्या प्रस्तावांची वर्गवारी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या अभ्यागतांची विभागणी सुस्पष्ट झाली नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर अनेक अडचणी आवासून उभ्या राहतील. अशाच काही अडचणी पासून आपली सुटका करण्यासाठी, आपल्या स्वतःच्या पदाची आणि सरकारची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांना साकडं घातलं. मुख्यमंत्री कार्यालयाच्या उडालेल्या बोजवाऱ्याबाबतीत प्रतिक्रिया जाणण्यासाठी त्यांना अनेकदा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Latest Posts

Don't Miss