spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची जोडी ठरतेय सुपरहिट

२०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या या जोडीनं अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे.

नावीन्याचा ध्यास घेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बऱ्याच संगीतकारांनी मनोरंजन विश्वात नाव कमावलं आहे. या यादीत सध्या आघाडीवर असलेली संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत.. २०१० मध्ये सिनेसृष्टीतील आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या या जोडीनं अविरतपणे १२ वर्षे काम करून संगीतप्रेमींच्या मनावर आपल्या संगीताचा अमीट ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही कायम जमिनीवर राहून संगीताची सेवा करण्याचं ब्रीद जपत अविनाश-विश्वजीत यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी मनोरंजन विश्वाला दिली आहेत.

‘कधी तू रिमझिम झरणारी…’, ‘ओल्या सांज वेळी…’, ‘ह्रदयात वाजे समथिंग…’ ही गाजलेली रोमँटिक गाणी आठवली की आपोआपच संगीतकार अविनाश-विश्वजीत यांची आठवण होते. रोमँटिक गाणी म्हणजे अविनाश-विश्वजीत हे समीकरण जणू तयार झालं, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या दोन्ही  चित्रपटांच्या गाण्यांतून लोकसंगीताचा रांगडा बाज दाखवत वेगळी झलक रसिकांना दाखवून दिली आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या ‘धर्मवीर – मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या दोन सुपरहिट मराठी चित्रपटांतील ‘धर्मवीर’मधील ‘असा हा धर्मवीर…’ या टायटल साँगसह ‘सरसेनापती हंबीरराव’मधील ‘हंबीर तू, खंबीर तू…’ हे गाणं रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या दोन चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी झालेल्या अविनाश-विश्वजीत यांचे लवकरच आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

अविनाश-विश्वजीत म्हणजे अर्थातच अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी ही मराठमोळ्या संगीतकारांची जोडी… या जोडीतील विश्वजीत यांच्याकडे संगीतासोबतच गीतलेखनाचीही कला आहे. २००४ पासून विश्वजीत आणि अविनाश यांनी एकत्रितपणे आपली कारकिर्द सुरू केली. सुरुवातीला पार्श्वसंगीत आणि नंतर संगीत दिग्दर्शक असा नावलौकीक मिळवणारी ही संगीत दिग्दर्शकांची जोडी आज रसिकांची आवडती बनली आहे. रेडिओ मिर्ची म्युझिक अॅवार्ड, मटा सन्मान, सांस्कृतिक कलादार्पण पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर अशा वेगवेगळया पुरस्कार महोत्सवांमध्ये त्यांनी कायम बाजी मारत आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे.

 

Latest Posts

Don't Miss