spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वर्षांचा कालखंड हा छोटा नाही आणि या देशात निरंकाळ असलेल्या पक्षांच्या तुलनेने मर्यादित कालखंड आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वर्षांचा कालखंड हा छोटा नाही आणि या देशात निरंकाळ असलेल्या पक्षांच्या तुलनेने मर्यादित कालखंड आहे. महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक निर्णय हे शरद पवार मुख्यमंत्री असताना घेतले गेले. पक्षाच्या स्थापनेनंतर या पक्षाने देशात आणि राज्यात नेत्रदीपक कामगिरी बजावली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक बदलांसाठी महत्त्वाचे निर्णय पक्षाच्या नेतृत्वाने त्या – त्या वेळी घेतले. महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष ज्यांच्यावर टीका केल्याशिवाय सत्तेत बसणाऱ्यांचा एकही दिवस जात नाही, एवढं महत्त्व महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे असेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व नेस्तनाबूत कसे करायचे हा प्रयत्न अखंडितपणे गेले काही वर्षे सुरू आहे. गेल्या चार-आठ दिवसात विरोधकांनी किती खालची पातळी गाठली आहे हे आपण पाहत आहोत. पवारांबाबत बेताल वक्तव्ये केली जात आहेत. सत्तेत बसणाऱ्यांनी बाळगलेले जे लोक आहेत त्यांना दुसऱ्यांवर सोडायचे काम गेले काही वर्षे सुरू आहे. त्या माध्यमातून किती जहरी आणि खालच्या पातळीची टीका केली जाते हे सगळं आपण पाहिले आहे. जेव्हा मला असे विचारले जाते की, फक्त राष्ट्रवादीबाबतच का असे घडते तर याचे कारण म्हणजे भाजपाला महाराष्ट्रात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच खंबीरपणे विरोध करत आहे. हा पक्षच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढील पिढीला देऊ शकतो. आपल्या पक्षाचे नेतृत्व हे देशातील सर्वात प्रगल्भ, सर्वात अनुभवी आणि भारताला योग्य दिशा देणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आदरणीय पवारांवर हल्ला होणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यावर हल्ला होणे या सर्व गोष्टी आज नित्याच्या व्हायला लागल्या आहेत. कारण आपल्या पक्षाशिवाय दुसरा कोणता पक्ष त्यांना महत्त्वाचा वाटत नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन आपला पक्ष कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार बळकट करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहेत. दुदैवाने आज महाराष्ट्रात जातीयवादी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. जाणीवपूर्वक दोन धर्मात वाद कसा होईल, त्याठिकाणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील ठराविक पक्ष करत आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गेल्या एक-दोन महिन्यात निरनिराळ्या भागात, शहरात जे वातावरण निर्माण करण्यात आले याचा अर्थ एकच आहे की, यांना आता निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचे पाप काही लोक करत आहेत. सत्तेत बसलेले लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांना आळा घालण्याचे सामर्थ्य सत्ताधाऱ्यांमध्ये नाही किंवा ते बघत बसण्याची त्यांची इच्छा आहे. अशावेळी आपल्या सर्वांची जबाबदारी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र दंगामुक्त व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र दंगामुक्त करून कोणत्याही गावात, शहरात दंगे होणार नाहीत यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पुढे राहील व महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुढाकार घेईल असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

विरोधी पक्षांतील नेत्यांवर, पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम आज राज्यात होताना दिसते. अशा प्रकारचे कधीच काम गृहखात्याने केलेले नाही. याउलट सत्तेत असणाऱ्या पक्षाने असे काम केले तर त्याकडे कित्येक दिवस दुर्लक्ष केले जाते. कशाही प्रकारे ट्विट केले, संदेश लिहिला तर त्याकडे दुर्लक्ष करणे व तो जास्तीत जास्त प्रसारित होईपर्यंत गप्प बसणे असा वेगळ्या प्रकारचा पायंडा आज राज्यात गृहखात्याच्या माध्यमातून पडत आहे. त्यामुळे आपली लढाई मोठी आहे. आपल्याला एकसंघपणे सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांचे बळ २४ व्या वर्धापन दिनी पवारांवर, पक्षाच्या मागे अधिक खंबीरपणे उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यासाठी डोळस राहण्याची गरज आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर विधानसभेच्या व लोकसभेच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात लाडू वाटण्याची संधी आपल्याला मिळेल असा विश्वास व्यक्त करुया. आपण सर्व एकसंघ व एकत्रित राहिलो तर पवारांचे नेतृत्व एवढे मोठे आणि प्रगल्भ आहे की, कोणत्याही वादळात नौका पुढे घेऊन जाण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

श्रीकांत शिंदे यांना आता प्रत्येक सीटसाठी संघर्ष करावा लागणार राऊतांचा दावा

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss