spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विनायक मेटेंना अनेक राजकीय नेत्यांनी केली श्रद्धांजली अर्पण

त्याच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आज सकाळी (१४ आगस्ट) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं पण डोक्याला आणि हाताला जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विनायक मेटे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच योगदान दिलंय. विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख तर होतेच पण त्याचबरोबर ते अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. यापूर्वी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने त्यांनी घडवून आणली आहेत. मराठा आरक्षण आंदोलनातील ते एक महत्वाचे नेते होते. आज मराठा आरक्षणासंबंधी एका बैठकीसाठी जाताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यूही झाला. त्याच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मेटेंच्या कुटुंबाची भेट

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केलं. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही अत्यंत दुर्दैवी घटना असून राज्य सरकार विनायक मेटे यांच्या कुटुंबासोबत आहे. या वृत्तावर माझाही विश्वास बसला नाही.”

त्यांच्या उद्दिष्टासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल – अजित पवार

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. शरद पवार हेही त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांनी यावेळी मेटेंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी अजित पवार म्हणले, “आजच्या दिवसाची सुरुवातच धक्कादायक होती. सामान्य कुटुंबात जन्मलेली एखादी व्यक्ती राज्यपातळीवर कसा प्रभाव पाडते याचं मेटे उत्तम उदाहरण होते. मराठा आरक्षण प्रश्नाबद्दल जनमत तयार करण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी शिवसंग्राम पक्ष, तसंच शिवरायांच्या स्मारकासाठी त्यांनी एक व्रत घेतलं. राजकीय पेक्षा सामाजिक दृष्ट्या ते अधिक कार्यरत होते. त्यांच्या उद्दिष्टासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल”

मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता गेला – चंद्रकांत पाटील

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक होती आणि त्याच बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. मराठा आरक्षणासाठी सातत्यानं लढणारा फार मोठा माणूस गेला आहे. मोठी आणि न भरुन निघणारी ही पोकळी निर्माण करून गेला.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि खासदार अमोल कोल्हेंनी ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली

मी माझा निकटचा सहकारी गमावला – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली

विनायक मेटेंना श्रद्धांजली वाहत राज्यपालांनीदेखील आता याबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य आणि दुर्लक्षित समाज घटकांच्या विकासातील त्यांचे योगदान खूप आहे. दिवंगत श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त केलं पाहिजे – नितीन गडकरी

“विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू ही एक दुर्दैवी घटना आहे. ते अत्यंत जवळचे मित्र होते.मनाला फार दुःख होत आहे.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक विकास कामत ते अगदी हिरहिरीने भाग घेत असत. त्याच्या निधनामुळे महाराष्ट्राला फार मोठे नुकसान झाले आहे.रस्त्यावर अपघात होतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात. लोकांनी एक संवेदनशील नागरिक बनण्याची गरज आहे. या अपघाताचं नेमकं कारण काय हे मला माहीत नाही. मात्र आपण संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणं, हीच मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल”. अशा शब्दात नितीन गडकरींनी शोक व्यक्त केला.

ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो – धनंजय मुंडे

विनायक मेटेंच्या निधनाबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणले, “माजी आ. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे, मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले. त्यांचे मराठा आरक्षण, शिवस्मारक या प्रश्नासोबतच आमच्या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मेटे साहेबांचा प्रवास पाहून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो… भावपूर्ण श्रद्धांजली”.

कॅबिनेट मंत्री डॉ तानाजी सावंतांनी केला दौरा रद्द

कॅबिनेट मंत्री डॉ तानाजी सावंत यांचा आजचा उस्मानाबाद जिल्हा दौरा रद्द, विनायक मेटे यांना मंत्री सावंत यांनी शोकसभा घेऊन वाहिली श्रद्धांजली

मला हक्काने बोलणारं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गेल्याने खुप वेदना झाल्या.- विनोद पाटील

मराठा समाजाचे लढवय्या नेतृत्व, मराठवाड्याचे सुपुत्र माजी आमदार विनायक मेटे साहेबांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाची कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही त्यांची इच्छा होती, दुर्दैवाने ती अपुरी राहिली असेच म्हणावे लागेल. आर. आर आबांचे ते अतिशय निकटवर्तीय होते, त्यामूळे मेटे साहेबांसोबत माझे व्यक्तिशः फार जुने संबंध होते. मला हक्काने बोलणारं एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गेल्याने खुप वेदना झाल्या. मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मेटे साहेबांना भावपूर्ण आदरांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

हे ही वाचा:

विनायक मेटे यांचे निधन; मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला

Latest Posts

Don't Miss