spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चांद्रयान आणि सूर्यमोहिमेपेक्षाही कठीण आहे म्हाडाच्या मास्टरलिस्टची मोहीम

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आजपर्यंत जगातील कोणत्याच देशाला स्वारी करता आली नाही ती बाब भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य करताना चांद्रयानाची मोहीम फत्ते केली

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आजपर्यंत जगातील कोणत्याच देशाला स्वारी करता आली नाही ती बाब भारतीय शास्त्रज्ञांनी साध्य करताना चांद्रयानाची मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ ह्या पहिल्या सौरशाळेन यशस्वी उड्डाण केलंय. हा टप्पाही १२५ दिवसांत पूर्ण होणार आहे. मात्र त्याही पेक्षा कठीण काम म्हाडाच्या ईमारत दुरूस्ती आणि पुर्नरचना मंडळात (आरआर बोर्ड) सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले नऊ महिने या बोर्डातील कामाला अक्षरशः खीळ बसली आहे. पात्र ठरलेल्या भाडेकरूंनाही तिष्ठत रहावे लागत आहे. विशेष म्हणजे या बोर्डाची सुत्रे आणि म्हाडाच्या उपाध्यक्षपदी संजीव जयस्वालांसारखा ज्येष्ठ , कार्यक्षम अधिकारी असतानाही भाडेकरूंना खस्ता खाव्या लागत आहे.

म्हाडाच्या रिपेअर बोर्डा मार्फत जुन्या उपकर प्राप्त इमारतीतील भाडेकरूंना मास्टरलिस्टच्या माध्यमातून घरे दिली जातात. त्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून या भाडेकरूंची ज्येष्ठतेनुसार यादी बनविली जाते. त्यानंतर उपलब्धतेनुसार म्हाडा उपाध्यक्षांच्या आदेशानुसार रिपेअर बोर्ड पात्रता ते वितरण असा कार्यक्रम राबवते. आरआर बोर्डाचे मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखालील विभाग याची जबाबदारी पार पाडतो. या विभागातील सह मुख्य अधिकारी हा या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा असतो. म्हाडाच्या मास्टरलिस्टचे काम या स्तरावरील अधिकाऱ्याकडून पार पाडले जाते. या बोर्डातील सह मुख्य अधिकारी विशाल देशमुख यांची २३ जानेवारीला तडकाफडकी मुंबई बाहेर बदली करण्यात आली. त्यानंतर राज्याच्या प्रशासनातील अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून समजल्या जाणाऱ्या उमेश वाघ यांची २३ मे रोजी नेमणूक करण्यात आली. नवा अधिकारी नेमण्यासाठी गृहनिर्माण विभागाने पाच महिन्याचा काळ घालवला. यावरून या विभागाची व्याप्ती लक्षात येऊ शकेल. गेली १३ वर्षे मंत्रालयातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या उमेश वाघ यांनी आरआर बोर्डाच्या अभ्यासाला सुरूवात केली. त्याला आजपर्यंतचा वेळ गेला आहे. वाघ येण्याआधी सुमारे पावणे तीनशे लोकांची यादी आधीच्या अधिकाऱ्यांनी पात्र करून तयार ठेवली आहे . मात्र त्यांनाही तिष्ठत रहावे लागले आहे. अति संवेदनक्षम असलेल्या आणि म्हाडातीलच काही अधिकाऱ्यांनी आणि एजंटानी बदनाम केलेल्या या बोर्डाच्या कामातील खाचखळगे समजण्यासाठी नव्या सह मुख्यअधिकाऱ्यांनी वेळ घेतला यावर तसा कुणाचाही आक्षेप नव्हता. मात्र आता नऊ महिने उलटले तरी कामकाज सुरू न झाल्याने संक्रमण शिबिरात तिष्ठत पडलेल्या नागरिकांना म्हाडात खेटे मारण्याशिवाय पर्याय नाही.

म्हाडाच्या उपाध्यक्ष पदी संजीव जयस्वाल आल्या नंतर एका धडाकेबाज अधिकाऱ्याच्या आगमनाचे सगळ्यांनीच स्वागत केले. मात्र त्यानंतर त्यांना न केलेल्या चुकांसाठी ईडी चौकशीला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांचे म्हाडातील काम आणि निर्णय यावरच जयस्वाल यांनी स्वतःच निर्बंध लावून घेतले. त्याचा परिणाम या आरआर बोर्डालाही तसेच म्हाडाच्या कामकाजालाही बसला आहे. प्रत्यक्षात ३०० -३२५ चौरस फुटांच्या पुर्नरचित गाळ्यांचा विचरणाचा विषय रिपेअर बोर्डाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे (भाप्रसे) यांच्या स्तरावरच घेतला जातो. त्याला उपाध्यक्षांनी अद्याप मंजूरी न दिल्यामुळे गरीब, गरजू भाडेकरूंचा जीव टांगणीला लागला आहे. हे पुर्नरचित गाळे बंद ठेवून त्यांची निगराणीही म्हाडाला करणेही तापदायक झाले आहे.


याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अरूण डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच या पुर्नरचित गाळ्यांचे वाटप होईल. थोडा उशीर झालाय हे खरं आहे. पण आता भाडेकरूंची ही प्रतिक्षा लवकरच संपेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दक्षिण मुंबईच्या ‘ सी’ विभागातील एक ज्येष्ठ शिक्षिका या मास्टरलिस्ट साठी पात्र ठरल्यात. नाव न सांगण्याच्या अटीवर टाईम महाराष्ट्रशी बोलताना त्या म्हणाल्या प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांना एक विभाग समजून घेण्यासाठी आणि त्यानंतरचा निर्णय घेण्यासाठी ९-१० महिने लागले तर त्यापेक्षा चांद्रयानाचे उड्डाण आणि सूर्यमोहिम अधिक सोपी म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा: 

निहारिका रायजादा हिचा बोल्ड आणि आकर्षक अंदाज पाहा…

वाडगाभर सायीचे आता घरीच करा रवाळ साजूक तूप, घरच्या घरी तूप बनवणे आता सोपे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss