Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राष्ट्रपती राजवटीवरून शरद पवारांवर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट व २०१९ मधील पहाटेचा शपथविधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट व २०१९ मधील पहाटेचा शपथविधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. “ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते, ते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत,” अशी टीका राऊतांनी केली.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर बोलताना म्हटलं होतं की, या सरकारमध्ये पूर्ण काळ एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “फडणवीस एकनाथ शिंदेंना या सरकारच्या काळात पूर्ण काळ मुख्यमंत्री ठेऊन अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असं म्हणत आहेत. असं असेल तर मग फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालत बसणार आहेत का.” संजय राऊत म्हणाले, “ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते, ते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत. शिंदे गटातील २५ पेक्षा जास्त आमदारांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. तेही फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत. त्यांनी जरा याविषयीही बोलावं, मग भुतकाळात काय घडलं आणि काय नाही यावर चर्चा करावी.”

“महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे. फडणवीसांनी त्यावर बोलावं. मात्र, ते अजूनही राष्ट्रपती राजवटीवरच बोलत आहेत. त्यांनी त्यांचा एक भंपक माणूस राजभवनात आणून बसवला. त्याच्या माध्यमातून ते हे सर्व करून घेत होते. त्या काळात राजभवन राजकीय गुंडांचा अड्डा झाला होता. फडणवीस आमच्यावर काय आरोप करत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना पाच वर्षे मुख्यमंत्री ठेवणार हे काय सांगत आहेत. त्यांनी शिंदेंना बेकायदेशीरपणे त्या पदावर बसवलं आहे. अजित पवारांचीही आमदारकी जाणार आहे, जर ते कायद्याने, घटनेनुसार वागणार असतील तर. २०२४ नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही फार मोठा राजकीय धक्का बसलेला असेल,” असा दावा संजय राऊतांनी केला. “देवेंद्र फडणवीस स्वतःच त्यांचा स्वतःचा अपमान करत आहेत. दिल्लीने फडणवीसांचं ज्या पद्धतीने मातेरं आणि पोतेरं केलं आहे त्याची आम्हाला लाज वाटते. आम्हाला फडणवीसांची दया येते. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणि विधीमंडळ अध्यक्षांनी कायद्याने वागायचं असं मनात आणलं, तर एकनाथ शिंदे पाच मिनिटेही मुख्यमंत्रिपदावर राहू शकत नाही,” अशी टीका राऊतांनी केली.

हे ही वाचा: 

‘या’ कारणासाठी ललित प्रभाकर ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला

पुण्यातील येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss