spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nitin Desai एक संघर्षमय कहाणी..

गेल्याच वर्षी २ ऑक्टोबर २०२३ रोजी नितीन देसाई यांचे निधन झाले होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करून त्यांची जीवन यात्रा संपवली होती. कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कला आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. स्थानिक आमदार महेश बालदी त्यावेळी म्हणाले होते की, “ते मला दीड महिन्यापूर्वी भेटले तेव्हा ते आर्थिक विवंचनेत होते. हेच त्यांच्या आत्महत्येचं कारण असू शकतं. दुसरं कोणतंही कारण सध्यातरी वाटत नाहीये.” अशा या कार्यतत्पर, सर्वगुणसंपन्न कलादिग्दर्शकास आज आपण या लेखा निमित्त आदरांजली देऊयात. आणि त्यांच्या विषयीच्या काही आठवणींना उजाळा देऊ.

नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोली झाला होता. कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. लगान (२००१), देवदास (२००२), जोधा अकबर (२००८), प्रेम रतन धन पायो (२०१५) या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं.त्यांनी कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००५ मध्ये त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ सुरू केला होता. भव्यदिव्य सेट, अनोखं कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती. मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे.

त्यांची संघर्षमय कहाणी :

नितीन देसाई यांचा जन्म एका मराठी मध्यमवर्गीय घरात झाला होता. त्यांनी जेजे स्कूलमधून फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं होतं. मात्र एकदा ते चित्रपटाच्या सेटवर गेले आणि ते त्या क्षेत्राच्या प्रेमात पडले. ‘तमस’ या दुरदर्शनवरच्या मालिकेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी चाणक्य मालिकेसाठी कला दिग्दर्शन केलं. १९४२ ‘अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने त्यांना ब्रेक दिला आणि त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात ते सांगतात, “मी ज्या घरात मोठा झालो त्यावेळी सगळ्यांना वाटायचं की आपल्या पोरांनी इंजिनिअर, डॉक्टर, व्हावं असं वाटायचं त्या काळात कला क्षेत्रात आणि त्यातही चित्रपट क्षेत्रात जायचं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. मात्र माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा दिला. बीडीडी चाळीत माझा जन्म झाला. जेव्हा जेजे स्कुलमधून निघालो, तेव्हा मला फोटोग्राफीचा छंद जडला.”

“पहिल्यांदा मी ‘तमस’च्या सेटवर सहाय्यक म्हणून कामाला होतो. तिथे मी १३ दिवस आणि १३ रात्री न थकता काम केलं. त्या क्षणी मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मिळाल्यासारखं वाटलं. मी कामात इतका गढून गेलो होतो की मी घरी गेलो नाही. माझ्या घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला घेतली होती. असे ते सुरुवातीचे दिवस होते. पण मला मजा आली. आईविषयीचा एक किस्सा ते नेहमी भावूक होऊन सांगतात, “मी स्वतंत्रपणे जेव्हा चाणक्यचा सेट उभारला तेव्हा मी माझ्या आईला तिथे घेऊन गेलो. सुरुवातीला तिला माझं काम कळलंच नाही. जेव्हा मी तिला नीट समजावून सांगितलं तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.”

देविदास सेटची निर्मिती कशी झाली ?

देवदास चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या निर्मितीची कथा त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितली होती.ते म्हणतात, “देवदास तेव्हापर्यंत नऊ वेळा तयार करण्यात आला होता. आम्ही FTII मध्ये जाऊन आधीच्या आवृत्यांचा नीट अभ्यास केला. तेव्हा तो अतिशय भव्यदिव्य तयार करण्याचा निर्णय घेतला. मी संजय लीला भन्साळींना अट घातली की संपूर्ण सेट तुला वापरावा लागेल. कारण हम दिल दे चुके सनमच्या वेळी पूर्ण सेट वापरला गेला नव्हता. चंद्रमुखीच्या पात्रासाठी आम्ही टेम्पल आर्किटेक्चरचा वापर केला होता. माधुरी दीक्षित तेव्हा लग्न करून अमेरिकेला गेली होती. तेव्हा संजयने तिला अमेरिकेहून बोलावून घेतलं होतं. जेव्हा तिने तो सेट पाहिला तेव्हा ती अतिशय खूश झाली. ती म्हणाली की इतकं भव्य काम केलंय, आता मला डबल रिहर्सल करावी लागेल.”

Mhada Project : २४ हजाराहून अधिक झोपडीधारकांना मिळणार स्वतःच्या हक्काचे घर; झोपडपट्टी विकासाला मिळणार चालना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss