spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बिनधास्त तरीही संवेदनशील, बेफिकीर तरीही हळव्या, खोडकर तरीही तरल अशा Kishore Kumar यांना वाढदिवसानिमित्त आदरांजली

आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक किशोर कुमार यांची आज जयंती आहे. त्यांनी हिंदी, बंगाली, आसामी, गुजराती, भोजपुरी, कन्नड, मल्याळम आणि उर्दूत गाणी गायली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला होता. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. पण नंतर त्यांनी ते बदलून किशोर कुमार असे ठेवले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजवर अनेक गायक, अभिनेते, दिग्दर्शक होऊन गेले. पण ज्याची बरोबरी आजवर कुणीही करू शकलेलं नाही आणि कुणी करू शकतही नाही असे अभिनेते म्हणजे किशोर कुमार. त्या काळातील अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार ओळखले जायचे. आज ४ ऑगस्ट रोजी कुमार यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या काही आठवणींना आज इथे, या लेखात उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.

अगदी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत, अगदी अबालवृद्धांमध्ये  आजही एक आवाज प्रत्येकाच्या मनाला आनंद देऊन जातो तो आवाज The King of Playback Singing किशोर कुमार यांचा. किशोर कुमार हे उत्तम अभिनेते तर होतेच परंतु ते अद्वितीय असे गायकसुद्दा होते. मस्तीखोर आवाज, गाण्यामध्ये काही अशा म्हुर्क्या घेत असत ज्यातून ते गाण हे सामान्य माणसाच्या मनाला अधिक भीडायचं किंवा आजही भिडत. त्यांचा आवाज अगदी मृदू होता. त्यांचा आवाज म्हणजे जणू रखरखीत उन्हात हळूच एक वाऱ्याची झुळूक यावी असा होता. त्यांनी काही चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच अभिनयात सुद्धा आपला ठसा उमटवला. त्यांनी कधीच गाणं हा प्रकार शिकला नाही आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या आवाजात भावभावना या ओतप्रोत भरलेल्या जाणवतात. त्यांनी गायलेली गाणी ही आजतागायत अमर आहेत आणि त्या गाण्यांच्या रूपाने ते ही अमर आहेत. पार्श्वगायक, अभिनेता, परफॉर्मर असे बहुपेडी व्यक्तिमत्व लाभलेल्या किशोरकुमार यांच्या स्वभावात लोभस पैलू आणि अचंबित करणारे कंगोरे होते. त्यांच्या गाण्यांची जादू अद्याप संपलेली नाही. ती त्यांची ठळक ओळख. मात्र, त्याबरोबरच या कलंदर कलाकाराच्या समग्र, अलौकिक वाटाव्या अशा आयुष्यावर आधारित अनिरुद्ध भट्टाचार्य आणि पार्थिव धर यांनी ‘किशोर कुमार : दि अल्टिमेट बायोग्राफी’ या पुस्तकात वेध घेतला आहे. लेखकांनी जवळपास तीन दशके केलेल्या सखोल संशोधनाची फलश्रुती म्हणजे हे पुस्तक. ही मेहनत पानोपानी दृग्गोचर होते.

मध्य प्रदेशातील खांडवा येथे किशोरकुमार यांचे गेलेले बालपण, त्या गावाशी असलेले अतूट स्नेहबंध, संगीताची उपजत आवड, महाविद्यालयात असताना शिक्षणापेक्षा गाण्यातच असणारे स्वारस्य, दुबे नावाच्या प्राध्यापकाने ‘गाने बजाने से जीवन नहीं चलेगा’ असा सल्ला दिल्यावर ‘सर, मैं इसी में अपना करियर बनाउंगा’ असे दिलेले उत्तर, शास्त्रीय संगीत शिकण्याची परवानगी घरातून मिळण्याची शक्यता नसूनही चित्रपट आणि गाण्यांच्या क्षेत्रातच जाण्याची असणारी ऊर्मी, त्यातून मुंबईला येण्याचा निर्णय, मुकेश, मन्ना डे असे गायक असताना किशोरला सुरुवातीस हिंदी चित्रपटसृष्टीत मिळालेला नकार, नंतर बंगाली आणि हिंदी चित्रपटांत त्यांचे गाणे म्हणजे चलनी नाणेच होते. अभिनेता म्हणून केलेल्या भूमिका, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून मुशाफिरी हा सारा विस्तृत पट म्हणजे त्यांचे जीवन. त्यांची अशी अनेक गाणी आहेत ज्यात त्या गाण्यामागे अनेक कहाण्या लपल्या आहेत. त्यांचं गाण्यांप्रतीच प्रेम सुद्धा अफाट होत. गाणं ज्या परिस्थितीतील आहे त्या परिस्थिती नुसार त्यांचे वागणे त्यातून गाण्यात येणार जिवंतपणा हे सर्व सौन्दर्य हे त्यांच्याच आवाजात आहे. यावरून त्यांचा एक प्रसंग होता एक गाणं होत जे गाणं त्यांनी टोव्हेल परिधान करून गायलं होत. ते गाणं नंतर पुढे खूप प्रसिद्ध तर झालच आणि अजरामर सुद्धा ठरलं.

एकदा किशोर कुमार अशोक यांच्या बॉम्बे टॉकीजच्या कचेरीत गेले होते. तिथे बाहेरच्या बाजूला ते सहगलचं गाणं गुणगुणत थांबले होते. इतक्यात, ‘जिद्दी’ या चित्रपटाच्या संगीतावर काम करत असलेले विख्यात संगीतकार खेमचंद प्रकाश थोडे पाय मोकळे करायला इमारतीबाहेर आले, तर त्यांना किशोर कुमार गाताना दिसले.त्यांनी लगेचच किशोर यांना आत येऊन भेटायला सांगितलं. आत आल्यावर खेमचंद यांनी किशोर कुमार यांच्या समोर हार्मोनियम ठेवली आणि बाहेर गात असलेलं गाणं गायला सांगितलं. थोडा वेळ गाणं ऐकून झाल्यावर त्यांनी किशोर कुमार यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटात गाण्याची ऑफर दिली. किशोर कुमारांनी हा प्रस्ताव लगेच स्वीकारला. रेकॉर्डिंगच्या दिवशी खेमचंद यांनी अशोक कुमार यांना आणि ‘जिद्दी’ नायकाची भूमिका करणारे देव आनंद यांना गाणं ऐकण्यासाठी बोलावलं. पहिल्याच दिवशी किशोर कुमार यांच्या गाण्याला हिरवा कंदिल दाखवण्यात आला. त्यांच्या पाहिल्यागण्याची सुरुवात अशी झाली.

किशोर कुमार यांना तब्बल २७ वेळा सर्वोत्तम गायकाच्या पुरस्कारासाठी फिल्मफेअरचं नामांकन मिळालं. आठ वेळा त्यांनी हा पुरस्कार जिंकला. शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण नसतानाही त्यांनी राग शिवरंजनीमधील ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणं उत्कृष्टरित्या म्हटलं, १९८१ साली राग यमनमधील ‘छू कर मेरे मन को’ हे गाणंही तितक्याच सहजतेने म्हटलं. ही एक अनन्यसाधारण बाब होती. किशोर कुमार यांच्या चित्रपट क्षेत्रातील संगीतप्रवासाचा आलेख नोंदवताना १९७७ सालातील ‘अनुरोध’ या चित्रपटामधील गाण्याचे बोल आठवतात:

“आप के अनुरोध पर मै ये गीत सुनाता हूँ,
अपने दिल की बातों से आप का दिल बहलाता हूँ,
आपके अनुरोध पर…”

गाण्यात असंबद्ध शब्द, यॉडलिंग यांचा उपयोग करून गाणे रंजक करणारे किशोर हे पहिले गायक. कारकिर्दीबरोबरच बिनधास्त; तरीही संवेदनशील, बेफिकीर; तरीही हळव्या, खोडकर; तरीही तरल अशा किशोरकुमार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदरांजली इथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा:

Nitin Gadkari यांनी केली मोठी घोषणा; रस्ते अपघातांना तोड म्हणून राज्यात येणार नवी कार्यप्रणाली

BAMS शिक्षणासाठी आता मिळणार राज्यातून प्रवेश; मुख्यमंत्र्यानी केली ‘ही’ नवी घोषणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss