spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ST Bus Strike: ST कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप, प्रवाशांची गैरसोय; राज्याची स्थिती काय?

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. आज मंगळवार ३  सप्टेंबरपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामध्ये बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर गर्दी दिसून येत आहे. संत नगरी शेगाव येथील बसस्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत. त्यामुळे शेगाव येथून राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केलंय. आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees) आपल्या विविध मागण्याकरता संपाचे हत्यार उपासले असून यावेळी येवला आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या मान्य कराव्या अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी सेवा बंद असल्याने अक्षरशः प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल असून परीक्षेची वेळ असल्याने एसटी बंद असल्याने पेपरला कसे जावे, असा मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता बसेस सोडण्यात आल्या आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून बस सेवा सुरू होईल अशी मागणी प्रवासीसह विद्यार्थी करत आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी ५४ दिवस बसची चाके थांबली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या तोंडावर आपल्या वेतनाच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुदत उलटूनही वेतन प्रश्न सोडवला गेला नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. कल्याण (Kalyan) विठ्ठलवाडी आगारातून कोकणाच्या विविध भागांत जाणाऱ्या एसटी गाड्या थांबल्या आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. 500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी डेपोवर ठिय्या मांडला आहे, ज्यामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रवाशांचे नाहक हाल या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा:

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss