spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Marathwada Mukti Sangram Day: मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील, काय म्हणाले Raj Thackeray?

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियामार्फत मराठवाड्यातील जनतेला मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे राज ठाकरे यांचं ट्विट?

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मी मागे पण एकदा म्हणलं होतं तसं मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे! इतका तेजस्वी लढा ज्या प्रांताने दिला, तो प्रांत महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विकासाच्या अनुशेष भरून निघावा म्हणून कंठशोष करतोय. बरं असं पण नाही की इथे राजकीय नेतृत्व फुलली नाहीत. इथे नेतृत्व फुलली, त्यांना राज्याच्या राजकारणात मान्यता मिळाली फक्त त्यानंतर कधीही त्यातल्या एकाही नेतृत्वाने झपाट्याने मराठवाड्याचा विकास करावा असे प्रयत्न केले नाहीत.

मराठवाड्यात आज तरुण-तरुणींच्या मनात जो आक्रोश आहे, आपण कित्येक दशकं मागे पडलो आहोत ही जी भावना आहे, त्याचं कारण आत्तापर्यंतच्या राजकीय अनास्थेत आहे. मराठवाडयातील तरुण-तरुणी सरकारी नोकरीच्या तयारीसाठी पुण्यासारख्या शहरांत येतात, अफाट मेहनत करतात, पण मुळात सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी तुटपुंज्या, त्यात अनेकदा भरतीच होत नाही. त्यामुळे आयुष्याची अनेक वर्ष परीक्षांसाठी, पोटाला चिमटा देऊन ही मुलं मेहनत करतात. आणि इतकं होऊन जेंव्हा त्यांना यश मिळत नाही, बरं जिथून आलो तिथे परत जायचं तर तिथे संधी नाहीत, अशा अवस्थेत नैराश्य नाही येणार तर काय वेगळं होणार आहे? या गुणवान मुला-मुलींनी राज्यात निर्माण होणाऱ्या खाजगी उद्योगातील रोजगार संधीकडे बघावं, त्यासाठी त्यांचे स्किल्स तयार करावेत, तर ते सोडून ही मुलांच्या मनात जातींचं विष कालवण्यासाठी, आत्तापर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी आपली स्किल्स वापरली. मराठवाड्यातील तरुण-तरुणींकडे व्होटबँक म्हणून बघायला सुरुवात झाली आणि परिस्थिती गडद झाली.

मराठवाड्यातील जनतेच्या पायांत आधी रझाकारांनी बेड्या घालायचा प्रयत्न केला, त्या बेड्या तुम्ही तोडून फेकून दिल्यात… पण आता तुम्हाला जातीपातींच्या बेड्यांमध्ये अडकवलं गेलं. या बेड्या तुम्ही काढून फेकणार आहात का नाहीत ? मराठवाडा ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्राला समरसतेची शिकवण देणाऱ्यांची ही भूमी, प्रखर बुद्धिमत्ता असलेल्यांची भूमी आहे. मी १९८५ पासून मराठवाड्यात शेकडोवेळा येऊन गेलो आहे, हा भाग मला कायम आवडला आहे. इथल्या माणसांच्यात अफाट कष्ट करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, पण पायाला दोरी बांधायची आणि पळ सांगायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे. मी आजच्या दिवशी तुम्हाला मनापासून सांगतो की या जातपात, खोटी आश्वासनं यापासून मुक्ती मिळवण्याचा आणि नव्या जगाशी स्पर्धा करण्याचा आजचा दिवस आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सत्ता दिलीत त्यांच्याकडे मराठवाड्याच्या विकासाबद्दल कमालीचं कल्पना दारिद्र्य होतं आणि अनास्था होती. त्यांना जातपात, राजकारण आणि मतं मिळवून स्वतःच्या तुंबड्या भरून घेणे इतकंच माहित आहे. अशा लोकांच्या जोखडातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी दुसरा मुक्तिसंग्राम उभारावा लागेल… तुम्ही फक्त इच्छा तर प्रकट करा… या दुसऱ्या मुक्तिसंग्रामासाठी मुठी आवळून उभे रहा ! मग बघा माझ्यासकट माझा आख्खा पक्ष तुमच्यासाठी उभा राहील! मराठवाड्यातील जनतेला पुन्हा एकदा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा! अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss