Thursday, September 26, 2024

Latest Posts

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी Mahavachan Utsav चे आयोजन, उत्सवांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली असून 42 लाख 84 हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 96.22 टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. मोबाईल, टीव्ही, संगणक आदी स्क्रीनच्या वेडामुळे हल्ली मुले वाचनाच्या आनंदापासून दूर जाताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महावाचन उत्सव या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

राज्यात 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या महावाचन उत्सव उपक्रमामध्ये 66 हजार शाळांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत या वर्षी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली आहे. यावर्षी रिड इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांना दररोज किमान 10 मिनिटे नवीन काही वाचावे, असे आवाहन केले आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे; विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे; मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे; दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासाला चालना देणे आदी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

उपक्रमाचे स्वरुप

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी www.mahavachanutsav.org या नावाने वेब ॲप्लीकेशन विकसित करण्यात आले असून राज्यातील सर्व शाळा नोंदणी करीत आहेत. सहभागी विद्यार्थ्यांनी आवडत्या पुस्तकाचे वाचन करुन वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय लेखन करावयाचे आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय देण्यासाठी एका मिनिटाचा व्हिडिओ/ ऑडिओ क्लिप अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे.

हे ही वाचा:

Sanjay Raut यांना १५ दिवसांची कैद, कोर्टाच्या निकालानंतर Medha Somaiya यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कोर्टाकडून कंगना रणौतला मोठा दिलासा, या अटीवर रिलीज होऊ शकतो ‘इमर्जन्सी’ चित्रपट

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss