Friday, September 27, 2024

Latest Posts

रोहिदास पाटील यांच्या निधनाने अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व हरपले – नाना पटोले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील (८९) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून रोहिदास पाटील हे आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (Kunal patil) यांचे वडील होते.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. रोहिदास पाटील हे काँग्रेस विचाराचे सच्चे पाईक होते. काँग्रेसचा विचार त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या निधनाने सुसंस्कृत, संयमी, विनम्र अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात नाना पटोले म्हणाले की, दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार, खासदार, विविध खात्याचे मंत्री अशा पदावर काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खानदेशात काँग्रेस विचार तळागाळात पोहचण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवले. त्यानंतर काँग्रेस सेवादलचे सदस्य, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशी पदे भूषवली. १९७२ साली ते धुळे जिल्हा परिषदेवर निवडून गेले, १९८० साली त्यांनी विधानसभेच्या निवडणूकीत विजय मिळवला, १९८६ साली ते महसूल राज्यंमत्री झाले, कृषी, फलोत्पादन, रोजगार, ग्रामविकास, पाटबंधारे, गृहनिर्माण, संसदीय कार्यमंत्री अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून लोकांचे प्रश्न सोडवले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व उपाध्यक्ष पदावरही दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी काम केले आहे. शैक्षणिक संस्था सुरु करून धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण करुन दिली तसेच जवाहर शेतकरी सहकारी सुत गिरणी, जवाहर महिला सहकारी सूत गिरणी, जवाहर सहकारी कुक्कुट पालन संस्था, जवाहर सहकारी पशुखाद्य संस्थेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे विणले. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले. दांडगा जनसंपर्क व जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss