Sunday, September 29, 2024

Latest Posts

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती शिल्पाचे नाशिकमध्ये लोकार्पण

नाशिक येथील मुंबई नका येथे सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात १९३१ साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे.”

“या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय नेटके वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून ब्राँझ धातूचे देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.

स्मारकात आहे या विकास कामांचा समावेश

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात उभारण्यात येत असलेल्या या स्मारकात क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या पुतळ्यांचा समावेश असणार आहे. सुमारे २७१० मीटर जागेवर हे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची १८ फुट तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची १६.५० फुट इतकी आहे. या पुतळयाच्या परिसरात विशेष अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे. तसेच स्मारकातील विद्युत रोशनाईचा वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये अशी विशेष प्रकाश योजना याठिकाणी करण्यात आली आहे. तसेच या स्मारकात सुसज्ज वाहतून बेट, पाण्याचे कारंजे निर्माण करण्यात येऊन सर्व स्मारक परिसरात गार्डन व सुशोभिकरण करण्यात आले आहे.

असे आहे स्मारकातील शिल्प

महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची १८ फूट असून सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची उंची १६.५० फूट आहे. दोन्ही पुतळ्याची रुंदी प्रत्येकी – १४ फूट असून महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे वजन आठ टन असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे वजन ७ टन आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आला असून पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ यांनी केली आहे. कुडाळ, रत्नागिरी, कोकण येथे या पुतळ्याची निर्मिती झाली असून पुतळे बनविण्यासाठी ११ महिन्याचा कालावधी लागला आहे. पुतळ्यांचा एकूण खर्च ४ कोटी ६८ लाख इतका झाला आहे. हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी ८ फुट कॉंक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच ३० ते ४० फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss