MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार

MBBS, Nursing अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ, महाराष्ट्रात नवीन मेडिकल कॉलेज होणार

महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय विद्यार्थी एमबीबीएस, नर्सिंग, फिजिओथेरपी अभ्यासक्रमांच्या जागा वाढणार आहेत. राज्यामध्ये एकीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाची जागा शोधण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला राज्यांमधील ४९ नवीन महाविद्यालयाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. एमबीबीएस, फिजिओथरपी, निसर्गोपचार, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमासाठी मंजुरी करण्यात येणाऱ्या ४९ या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची फाईल मुख्यमंत्र्याकडे सहीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यभरातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांसाठी मुख्यमंत्र्यानी या कॉलेजांना जागा वाढून मान्यता दिल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यामध्ये एकीकडे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी मोजक्याच जागा आहेत. तर दुसऱ्या बाजूला ४९ खाजगी विद्यालयांना मान्यतेसाठी राज्य सरकारकडे अर्ज करण्यात आला आहे. या सर्व महाविद्यालयाच्या विविध तपासण्या पूर्ण केल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या समितीसह संशोधन संचानालय व वैद्यकीय शिक्षण यांनीही सर्व महाविद्यलयाची तपासणी आणि पाहणी पूर्ण केली आहे. या महाविद्यालयामध्ये, एक दंतवैद्य, १९ नर्सिंग, एमबीबीएसची तीन,आठ पोस्ट बेसिक नर्सिंग, १४ आयुर्वेदिक आणि दोन होपिओपथी विद्यालयाचा समावेश आहे. उर्वरित दोन विद्यालयापैकी एक फिजिओथेरपीसाठी आणि एक निसर्गोपचारासाठी आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेत अनेक हाय-पर्सेटाइल मिळाल्याने प्रवेशासाठी चांगलीच चुरस आहे. त्यामुळे अनेक वैद्यकीय महाविद्यालयाची कट-ऑफही यंदा जास्त आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एक तर शाखा बदलणे, खाजगी कॉलेज निवडणे,किंवा पुढल्या वर्षी पुन्हा परीक्षा देणे एवढेच पर्याय आहे. राज्यामध्ये पहिल्या गुणवत्ता यादीची कट-ऑफ ६४२ आहेत. गेल्या वर्षी ही कट-ऑफ ५८७ पर्सेंटाइल एवढी होती. यावर्षी महाविद्यालयामध्येही ६०२ पर्सेंटाइलला पहिल्या यादीचे प्रवेश थांबले आहेत. सर्व विद्यालयांमध्ये प्रवेश पूर्ण झाले, तर मोठ्या संख्येने विद्यार्थी वंचित राहतील. यासाठी या कॉलेजांना मान्यता मिळणे गरजेचे आहे, असे मत काही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनांनी व्यक्त केले आहे. मात्र खाजगी महाविद्यालयाकडून वारेमाप शुल्क आकारले जाते. त्यामुळे या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणार का, असे प्रश्न विद्यार्थी आणि त्याच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version