सुप्रसिद्ध गायक के के यांचे निधन । ‘हे’ ठरलं शेवटचं गाणं

बॉलिवूड चे सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के (KK)

सुप्रसिद्ध गायक के के यांचे निधन । ‘हे’ ठरलं शेवटचं गाणं
बॉलिवूड चे सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के (KK) Krishna kumar Kunnath यांचे मंगळवार दि ३१ मे रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी कोलकत्ता येथे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीमुळे देशभरातून सगळीकडेच दुःख व्यक्त केले जात आहे. एका कॉलेजने दक्षिण कोलकत्ता ‘नजरुल मंच’ येथे मंगळवारी हा कॉन्सर्ट आयोजित केला होता. जवळपास एक तास के के यांनी गाणी गायिली होती. शेवटचे गाणे संपताच काही वेळातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला.  त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिटयूट येथे नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या कॉन्सर्ट चे अनेक व्हिडिओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका व्हिडिओत के के ‘याद आयेंगे ये पल’ हे शेवटचं गाणं म्हणताना त्यांच्या हालचालींवरून ते अस्वस्थ असल्याचे दिसून आले. के के हे बॉलिवूड मधील मोठे नाव होते. के.के. अर्थात कृष्ण कुमार कुन्नथ यांचा जन्‍म 3 ऑगस्ट १९६८ रोजी दिल्ली येथे झाला होता.
हिंदी सोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही के के यांनी अनेक गाणी गायली आहेत. ‘हम दिल दे चू के सनम’ चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. चित्रपटात ब्रेक मिळण्या आधी त्यांनी ३५०० जिंगल सुद्धा गायली आहेत. त्यांचे ‘यारो दोस्ती’ हे गीत ऐकल्यावर डोळे पाणावल्या शिवाय राहवत नाही.
१९९९ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय क्रिकेट टीमसाठी  त्यांनी “जोश ऑफ इंडिया” हे गीत गायले होते.  के के यांची गाणी सर्वच वयोगटातील रसिक प्रेक्षकांना आवडायची. सोशल मीडियावर अनेकांनी ”के के तुमची गाणी आणि तुम्ही सदैव आमच्या हृदयात रहाल” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
गायक के के यांच्या अशा अचानक जाण्याने सिनेसृष्टीतून देखील हळहळ व्यक्त केली जाते आहे.
कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के यांच्या पश्चात त्यांची बायको मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे.
Exit mobile version