spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024: माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे ‘वारी’, Kiran Mane यांची वारकरी संप्रदायावर पुन्हा एक पोस्ट

नेहमीच नवनवीन विषयांना घेऊन सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणारे अभिनेते किरण माने यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी ‘वारकरी संप्रदाय’ या विषयावर भाष्य केले आहे. जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे ‘वारी’ आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे ‘वारकरी संप्रदाय.’ असे किरण माने यांनी म्हटले आहे. विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता- ‘सेना न्हावी’! संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापास्नं हादरे दिले असल्याचे सांगत किरण माने यांनी काही अभंगांचा संदर्भ दिला आहे.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी

त्यावेळी उच्छाद मांडलेल्या विषारी वैदिक पिलावळीला त्यांनी आल्याआल्या इशारा दिला,
“आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।”

धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत. आपल्या धारदार शब्दांच्या वस्तार्‍यानं त्या ट्रोलर्सची लै बेक्कार भादरायला सुरूवात केली,
“धर्माचे थोतांड । करुनि भरी पोट । भार्या मुले मठ । मजा करी ।।
पुराण सांगता । नागावानी डोले । अविर्भाव फोल । करीतसे ।।
गळा माळा भस्म । नेसे पितांबर । साधुचा आचार । दाखवितो ।।
सेना म्हणे ऐशा । दांभिका भजती । दोघेही जाताती । अधोगती ।।”
असे दणके देत पार चंपीच करुन टाकली त्यांची.

ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना ‘पाप पुण्या’ची भिती दाखवून या कर्मकांड, दैववादात अडकवलं होतं. ते उडवून लावत सेना महाराज बहुजनांना सांगायचे, पुण्य मिळवण्यासाठी यज्ञयाग, अभिषेक करून ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही… माणुसकीच्या नात्यानं परोपकार करा, पुण्य मिळेल… “करीता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ।। करिता परपीडा । त्याच्या पायी नाही जोडा ।।”

‘धर्मोपदेश’ करून अडाणी कष्टकरी जनतेला भुलवणार्‍या पाखंडी बुवाबापूंचे बुरखे फाडताना ते म्हणतात,
“धर्म उपदेशी मागेल जो अर्धी । तयाचिया प्रीती भजू नये ।।
थाटमाट करुनि लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलू नये ।।”

एक लक्षात घ्या, हे विचार सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपुर्वी ! त्याकाळात बहुजनांना, “उपास तापास नका करू व्रत । राहा धरुनी चित्त हरी पायी ।।” असा साधासोपा धर्म शिकवणं म्हणजे खायचं काम नव्हतं राजेहो. विशेष म्हणजे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत सेनांच्या एका अभंगाचा समावेश आहे.

“जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ।।
तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।।
सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ।।
सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।।”
कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्‍या सेना महाराजांना त्रिवार वंदन. ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल…

हे ही वाचा:

Ulajh Trailer : देशाच्या उपउच्चायुक्त बनून जान्हवी कपूरने चालवली जादू…

सुप्रसिद्ध गायिकेचा थक्क करणारा जीवनप्रवास ‘मंगला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss