शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा

'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा

महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी समृद्ध झाला आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) ही शिवगर्जना! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर नेटाने संशोधन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनाचं औचित्य साधत झी स्टुडिओज ने एक मोठी घोषणा केली आहे. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दक्षिणेकडील चित्रपटांना मिळणारं यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचं देशभरातून कौतुक होत असताना आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी पाहायला मिळतात. या प्रश्नांची उत्तरं आता प्रेक्षकांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार असल्याचं बोललं जातंय.

‘हर हर महादेव’ हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे जो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने या बद्दल सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद पहायला मिळतोय. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे  व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल ४०० हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे.

त्याचबरोबर चित्रपटात कोण कोणते कलाकार असणार याबद्दल अद्याप कळू शकले नाहीये. हा चित्रपट दिवाळी २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आणखी एका ऐतिहासिक घटना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 

Exit mobile version