२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन, पटियाला हाऊस कोर्टाने दिला दिलासा

ईडीच्या आरोपपत्रानुसार जॅकलिनची एकूण ७ कोटी १२ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन, पटियाला हाऊस कोर्टाने दिला दिलासा

जॅकलिन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी ठरवण्यात आले आहे. या आरोपपत्राची दखल घेत गेल्या सुनावणीत न्यायालयाने जॅकलिनला २६ सप्टेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. यामुळे आज जॅकलिन कोर्टात हजर झाली. त्याच्या वकिलाने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला, त्यावर न्यायालयाने ईडीकडून उत्तर मागितले. दरम्यान, नियमित जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत अंतरिम जामीन जॅकलिनच्या वकिलाने मागितला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक दंड भरणीनंतर जामीन मंजूर केला. आरोपपत्राची प्रतही जॅकलिनला देण्यात आली होती. पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला होणार आहे.

खंडणीसारख्या गुन्ह्यांमधून कमावलेल्या पैशातून सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीचे म्हणणे आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला भेट देण्यासाठी त्याची सहकारी पिंकी इराणी हिला कामावर ठेवले होते. पिंकी इराणीलाही ईडीने या प्रकरणात आरोपी ठरवले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिनने ३० ऑगस्ट आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी नोंदवलेल्या जबाबात तिने सुकेश आणि त्याची पत्नी लीना यांच्याकडून भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले. यामुळे ईडीने एप्रिलमध्ये जॅकलिनची ७ कोटी १२ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून ऑगस्टमध्ये अटक होईपर्यंत सुकेश चंद्रशेखर जॅकलिन फर्नांडिसच्या सतत संपर्कात होता.

ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पूर्ववृत्तांची माहिती असूनही जॅकलीन त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू, दागिने इत्यादी घेत होती. त्यांनी सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी भूतकाळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांच्यासोबतचे पैशाचे व्यवहार कायम ठेवल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. एवढंच नव्हे, तर तिच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी देखील त्याचा आर्थिक फायदा घेतला. साहजिकच पैशाचा लोभ इतका मोठा होता की सुकेशच्या गुन्हेगारी भूतकाळाचा त्यांना काही फरक पडत नव्हता. इतकेच नाही तर जॅकलीनने तिला मिळालेल्या भेटवस्तूंबाबत वारंवार तिची विधाने बदलली. गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा जाणीवपूर्वक वापर केल्यामुळे जॅकलिनवर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

ईडीच्या आरोपपत्रानुसार जॅकलिनची एकूण ७ कोटी १२ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२१ दरम्यान, जॅकलिनला पिंकी इराणी मार्फत २,६६,७७,४०१ रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या. मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान, जॅकलिनला ३,०४,३४,५४१ रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या. मार्च २०२१ ते जून २०२१ दरम्यान, जॅकलिनची बहीण जेराल्डिन वॉकरला तिच्या यूएसए-आधारित खात्यातून १,२६,०९,७७० रुपये पाठवले गेले. जून २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियातील जॅकलिनचा भाऊ वॉरन फर्नांडिस यांच्या कॉमन वेल्थ बँक खात्यावर १५,०३,०५५ रुपये पाठवण्यात आले.

हे ही वाचा:

Shiv bhojan Thali : राज्यात शिवभोजन थाळी बंद होणार ?

विश्व हिंदू परिषदेची मागणी, ‘गरबा उत्सवात आधार कार्ड…’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version