आता राजमाता जिजामाता यांची यशोगाथा दिसणार मोठ्या पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

आता राजमाता जिजामाता यांची यशोगाथा दिसणार मोठ्या पडद्यावर

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला,
घडविले तिने त्या शूर शिवबाला!!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजुन त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या ‘जिजाऊ’ कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे म्हणा ना. स्त्री अबला नसून सबला आहे असे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत ‘६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे. जिजाबाईंच्या ४२५व्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

‘स्वराज्य कनिका -जिऊ’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे या चित्रपटात जिजाऊंच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. या चित्रपटात ईश्वरी जिजाऊंच्या बालपणीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ईश्वरी देशपांडे हा एक नवीन चेहरा सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. आता ईश्वरीसह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जगदंबेचा आशीर्वाद मिळत असून जिजाऊंच्या नजरेतील तीक्ष्णता अचूक हेरली जातेय. तर या चित्रपटाच्या निर्मात्या अनुजा देशपांडे यांचा ‘स्वराज्य कनिका -जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच चित्रपटाची कथा, संकल्पना ही अनुजा देशपांडे यांचीच आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘स्वराज्य कनिका – जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक घटना, Hockey World Cup कव्हर करणार कोरियन पत्रकार पडला नाल्यात

Tata Mumbai Marathon, यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला सरपंचही होणार सहभागी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version