Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Parna Pethe च्या ‘विषय हार्ड’ चा ट्रेलर रिलीज…

चित्रपटक्षेत्राला नेहमीच नव्या कल्पनांची गरज असते, अशीच एक नवी कल्पना घेऊन 'विषय हार्ड' हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

चित्रपटक्षेत्राला नेहमीच नव्या कल्पनांची गरज असते, अशीच एक नवी कल्पना घेऊन ‘विषय हार्ड’ हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील दृश्ये आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत.

ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक-नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करणारा आहे.

पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. नवोदित असूनही आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत.

या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केले आहे. साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिले आहे. अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून, सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलं असून, संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. गीत, संगीत, सिनेमॅटोग्राफी, कला, नृत्य, दिग्दर्शन, वेशभूषा, संकलन आदी सर्व पातळ्यांवर चित्रपट दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याला भरभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा: 

बालकलाकार मायरा वायकुळ होतेय प्रचंड ट्रोल, डोक्यात जाणारी मुलगी…म्हणत नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Bai Ga चित्रपटाचं पहिलं गाणं आऊट, प्रेक्षक अनुभवणार ‘जंतर मंतर’ ची जादू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss