उषा नाडकर्णी यांना “सांस्कृतिक कलादर्पण कलागौरव पुरस्कार” जाहीर

'सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा २०२२' येत्या ७ जून रोजी मुंबईत  होणार आहे.

उषा नाडकर्णी यांना “सांस्कृतिक कलादर्पण  कलागौरव पुरस्कार” जाहीर
मराठी रंगभूमी, चित्रपट आणि  मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येते. यंदाचे पुरस्कार जाहीर झाले असून या वर्षी “सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार”‘ ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि डॉ. विलास उजवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य मान्यवरांनीही यावेळी त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहेत. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जून रोजी मुंबईत  होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राजकारणातील, कलासृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरिता आणि समाजात मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि समुदायांना प्रोत्साहन देण्याचे प्रशंसनीय कार्य चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आहे. आजवर अनेक दिग्गजांना या संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जून रोजी ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी कळविले आहे.
Exit mobile version