‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा... महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक... जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज... उत्साह... दिसत आहे.

‘येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा… महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येत आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत. पोस्टर झळकल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात लक्षवेधी ठरली, ती पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. दरम्यान टिझरमध्ये धैर्य घोलपसह सायली पाटीलची झलकही दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत. ‘येक नंबर’ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, ”ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा मला वाटले, मला काही सांगायची आणि काही नवीन पद्धतीने गोष्ट मांडायची संधी आहे. प्रेक्षकांना ही माझी मांडणी कशी वाटेल, या बद्दल खूप उत्सुकता आहे.’’झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणतात, ” झी स्टुडिओजने आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. कथा ही कोणत्याही चित्रपटाची आत्मा असते. या चित्रपटाची कथाच अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला सर्वच कलाकारांनी उत्तम न्याय दिला आहे. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील इतिहासात माईलस्टोन चित्रपट ठरेल.’’

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणतात, ” चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. ‘येक नंबर’ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही.’’ नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या वरदा साजिद नाडियाडवाला म्हणतात, ” वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्यासाठी मी नेहमीच खूप उत्सुक असते आणि विशेषतः मराठी भाषेत. मराठी भाषेकडे साहित्याचा मोठा खजिना आहे. आणखी एका कारणासाठी मला मराठी भाषा हृदयाच्या खूप जवळची वाटते, ते म्हणजे माझे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहेत. म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. आणि अशा चित्रपटाचा मी भाग होतेय, याचा मला अत्यानंद आहे. ”

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version