‘येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी, राज ठाकरे, आमिर खान यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला.

‘येक नंबर’मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी, राज ठाकरे, आमिर खान यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

खरंतर या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट म्हणजे राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात माननीय राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या १० ऑक्टोबरला होणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे ती, या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, ‘येक नंबर’मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे ‘येक नंबर’मधून मलायकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘जाहीर झालं जगाला’ या प्रेमगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली असून सध्या हे गाणे प्रचंड गाजत आहे.

एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचा चित्रपट बहुदा पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘येक नंबर’म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणतात, ‘’ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच ‘येक नंबर’ चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.’’

अभिनेता आमिर खान ‘येक नंबर’ चित्रपटाबद्दल म्हणाला,” येक नंबर या चित्रपटातील सगळ्यांचे खूप खूप कौतुक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. मी तेजस्विनी, वरदा, राजेश मापुस्कर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात यश मिळो.’’ या चित्रपटाबद्दल निर्माते साजिद नाडियाडवाला म्हणाले, “माझ्या प्रोडक्शन हाऊसला ७४ वर्षे झाली. महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मला खूप आनंद आहे की, महाराष्ट्राने मला जे दिले त्याचे ऋण फेडण्याची संधी मला ‘येक नंबर’ने दिली आहे. तेजस्विनीने, टीमने या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत केली आहे. हा चित्रपट खूप यशस्वी होवो, अशी माझी इच्छा आहे.’’ या चित्रपटाबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणाले, “मी या चित्रपटाची कथा ऐकली होती आणि अखेर काही दिवसांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने मला अक्षरशः खिळवून ठेवले. महाराष्ट्राचा प्रत्येक पैलू या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले, “मी ही कथा वाचली, त्यावेळी मी पहिला प्रश्न हा विचारला की, परवानगी मिळणार का? आणि परवानगी मिळाल्यावर बनवणार कसा? कारण हा चित्रपट बनवणे अवघड आहे आणि आज आपण इथे आहोत म्हणजे हा चित्रपच उत्तम बनला असणार, याची खात्री आहे.’’ झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्माते आहेत. येत्या १० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा:

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

Mumbai Rain Incident: मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू, जबाबदार कोण?
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version