Sunday, July 7, 2024

Latest Posts

Exclusive: Yuvasena कोणाची Aaditya Thackeray ची की Varun Sardesai ची; Anil Parab यांच्या आमदारकीला धोका?

गेल्या काही काळात युवासेनेत आदित्य यांच्या पेक्षा वरूण यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या जागी आपल्याला संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता.

शिवसेनेने लोकसभा निवडणूकीत पडझडीनंतरही चांगले यश मिळवले आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानभूतीसह दलित आणि मुस्लिमांची मते मिळाली आहेत. मात्र पुन्हा एकदा शिवसेनेची सर्वात महत्वाची संघटना असलेल्या युवासेनेतच आलबेल नसल्याचं समोर येत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात सचिव वरूण सरदेसाईंना डावलल्यामुळे युवासेनेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. मुंबई पदवीधर संघाची निवडणूक २६ जूनला होणार आहे. या निवडणूकीत मतदानाचा अधिकार पदवीधर मतदारांना असतो. ज्येष्ठ शिवसेनानेते स्वर्गीय प्रमोद नवलकर या मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून जातचे. तेव्हा पासून हा मतदार संघ शिउबाठा सेनेसाठी हक्काचा आहे. आधी राज ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील भारतीय विद्यार्थी सेना आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचा ही जागा जिंकण्यात महत्वाचा वाटा असतो.

यंदा या निवडणूकीसाठी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी जोरदार तयारी केली होती . पदवीधर मतदार संघासाठी यावेळी २५ हजार नवमतदारांची नोंदणी वरूण सरदेसाई यांनी पुढाकार घेऊन केली होती. शिउबाठाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही सरदेसाईंना तयारीचे संकेत दिले होते. त्यामुळे त्यांनी जोरदार तयारी केली होती. प्रत्यक्षात माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना उध्दव ठाकरे यांनी पदवीधरची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर ते लंडनला निघून गेले. विदेशात जाण्यापूर्वी त्यांनी परब- सरदेसाई यांना एकत्र बसवून पक्ष निर्णयाबाबत कल्पना देऊन समजावणे गरजेचं होतं मात्र तसं न झाल्याने दोन्ही नेत्यांमधला गैरसमज वाढला. आणि त्यातूनच सरदेसाई यांनी युवासेनेतील कार्यकर्त्यांकडे परब यांच्या विरोधात ‘निरोप’ पाठवण्यास सुरूवात केली. या बाबतची वाच्यता भाजप नेते आशिष शेलार यांनी पक्षाच्या वांद्र्याच्या बैठकीत केल्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यानंतर सोशल मिडियावर Text War सुरू झालं.

वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावसभाऊ आहेत. युवासेनेचे ते सचिव आहेत. आदित्य यांच्या अखत्यारितील बरेच निर्णय हे वरूण घेत असल्यामुळे आणि ते रश्मी उध्दव ठाकरे यांच्या खूपच विश्वासातले असल्यामुळे अनेक ज्येष्ठ आमदार- खासदारांना ‘गोडबोल्या’ दमात घेण्याचे कामही ते करतात. त्यामुळे गेल्या काही काळात युवासेनेत आदित्य यांच्या पेक्षा वरूण यांचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या जागी आपल्याला संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आमदारांची १४ वर आलेली संख्या विधानपरिषदेचा कोटा पूर्ण करू शकत नाही. तसेच जनतेतून निवडून येणं ही अनिल परब यांच्या ‘बस की बात’ नसल्यामुळे त्यांनी ठाकरेंना गुंडाळून पाचव्यांदा पदवीधर मधून सेटिंग लावली आहे. युवासेनेचे पदाधिकारी अनिल परब यांचे काम करण्यासाठी ऐकत नसल्याची टिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जाहीरपणे केली होती. त्याला उत्तर देताना युवासेनेचे नेते पवन जाधव यांनी ‘शिवसेनेत फक्त मातोश्रींचा आणि ठाकरेंचाच आदेश चालतो. आम्ही शिवसैनिक फक्त मातोश्रीला मानतो बाकी कुणाला नाही’ अश्या आशयाचे X पोस्ट केली होते. या पोस्टमुळे पवन जाधव यांच्या निष्ठेचे कौतुक होत असले तरी या X पोस्टचा धनी दुसरेच कोणी असल्याची चर्चा दबक्या आवाजात शिवसेनेत सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी पवन जाधव यांना संपर्क साधला असता आपण एक्सप्रेस मध्ये आहोत. प्रवास संपला की संपर्क साधतो असं सांगून त्यांनी फोन ठेवला. वरूण सरदेसाई यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला मात्र दोन वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss