‘जैसी करनी वैसी भरनी’, BJP कटोरा घेऊन शिवसेनेच्या दारात!

‘जैसी करनी वैसी भरनी’, BJP कटोरा घेऊन शिवसेनेच्या दारात!

लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा महायुतीला मिळतील असा दावा करणाऱ्या भाजपने आता विधानसभेसाठी स्वतंत्र दावे सुरू केले आहेत. महायुतीचा आकडा मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही. स्वबळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपने यावेळी विधानसभेसाठी १२५ आमदारांचे टार्गेट ठेवले आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सर्वच स्थरावर आघाडी घेतल्याने जागा वाटपासाठी १०५ आमदार असलेल्या भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागेमागे फिरावे लागत आहे. युतीमध्ये मागच्या काळात उध्दव ठाकरेंना दुय्यम स्थान देणाऱ्या भाजपाचा आता उलटा फेरा सुरु झाला आहे. लोकसभेत विरोधकाला नामोहरम करण्यासाठी सत्ता व्यवस्थितपणे वापरणाऱ्या आणि संपत्तीची उधळण करणाऱ्या भाजप, शिंदेसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या तर महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या होत्या. भाजपने वेगवेगळे सर्व्हे केले तरीही विधानसभेत त्यांना ६० जागांपेक्षा जास्त जागा मिळू शकत नाहीत, हे लक्षात आल्याने आता टार्गेट १२५ असा प्रचार भाजपने सुरू केला आहे. सत्तेची फळे भाजप कार्यकर्त्यांपर्यंत न पोहचल्याने लोकसभेत कार्यकर्ता हा अजिबात ऍक्टिव्ह नव्हता त्यामुळे संघ स्वतः ऍक्टिव्ह झाला आहे.

विधानसभेच्या २८८ पैकी १६० जागा आपल्याला मिळाव्या असा भाजपचा आग्रह आहे. १२८ जागांमध्ये शिंदे सेना अजितदादांची राष्ट्रवादी आणि महायुतीला मदत करणाऱ्या छोट्या पक्षांची बोळवण करावी अशी तयारी भाजपने सुरू केले आहे. मात्र यावर दोन्ही पक्ष समाधानी होणार नाहीत हे स्पष्ट आहे. शिंदे सेनेने स्वतःच १२० जागांची मागणी केली आहे त्यामुळे चाळीस आमदार आणणाऱ्या शिंदे ना तिप्पट जागा कशासाठी द्याव्या? असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. पण शिंदेंचा सध्या राज्यात माहोल आहे. त्यांचा लोकसभेत स्ट्राईक रेट चांगला होता. त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला त्याला जास्त जागा, असा फॉर्म्युला असावा असा शिंदे सेनेचा आग्रह आहे. त्यामुळे भाजपाची गोची झाली आहे. लोकसभेत ऐकले पण शिंदे सेना आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे भाजपा सध्या गोंधळात आहे. शिंदेंच्या पाठीमागे फरपट जाण्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील नेते शिंदे सेनेशी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीनेच शिंदे सेनेशी चर्चा करावी अशी भूमिका घेतली आहे. पूर्वी शिवसेना १२४ आणि भाजप १६४ जागा लढवत असे. तरीही मुख्यमंत्री पदावरून भाजपाने उध्दव ठाकरे यांना समाधानी करु शकले नाहीत. युती तुटेपर्यंत संबंध ताणले गेले, २०१४ ला युती तुटली. त्यावेळी २५ वर्षे युतीत सडलो असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते. तेव्हा शिवसेनेला वेळप्रसंगी नमते घ्यावे लागत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून बरोबर उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता शिंदे सेनेसमोर भाजपाला जागा जास्त मिळतील पण राजकीय दृष्टीने नमते घ्यावे लागणार आहे.

लाडकी बहीण नक्की कुणाची?

राज्यातील लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीतील तिन्ही पक्षांनी श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला अजित दादा यांची या योजनेवरून जोरदार जाहिरात बाजी सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी जाहिरात बाजी सुरू केली तर गेल्या आठवड्यापासून ‘थँक्यू देवा भाऊ’ आणि ‘धन्यवाद देवा भाऊ’ अशा या जाहिराती सुरू झाल्या. एका बाजूला लाडकी बहीण योजनेला पैसा दिल्यामुळे अनेक विकास कामे आता निधी अभावी बंद पडली आहेत. आता या विकास कामाच्या फाईल नवीन सरकार आल्यानंतरच उघडल्या जातील. मात्र लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या जाहिरात बाजीवर कोट्यवधी रुपयांची उधळण होत आहे. एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली ते भाजपाला फारसे पटलेले नाही पण निवडणूक जिंकायची असल्याने भाजपा गप्प आहे. जुन्या शिवसेनेसोबत भाजपाने जे केले, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी रुबाब दाखवला त्याच देवेंद्र फडणवीस यांना आता शिंदे सेनेसमोर जागांसाठी पदर पसरून उभे राहण्याची वेळ आली आहे. ‘जैसी करनी वैसी भरनी’ या उक्तीप्रमाणे राज्यात सध्या परिस्थिती पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

चैत्यभूमीवर जाऊन महामानव आंबेडकरांच्या स्मृतिस्थळासमोर नाक घासा, एवढे तरी करा..Naresh Mhaske यांचं Rahul Gandhi यांना पत्र

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version