Mahayuti ला परतीच्या पावसाने झोडपले, मुंबईत शरमेची बाब!

Mahayuti ला परतीच्या पावसाने झोडपले, मुंबईत शरमेची बाब!

आधीच पाय खड्ड्यात अडकलेल्या महायुती (Mahayuti) च्या सरकारला निवडणूकीच्या तोंडावर परतीच्या पावसाने पण जोरदार दणका देऊन झोडपून काढले आहे. आधीच मराठा (Maratha), ओबीसी (OBC) आणि धनगर समाजाच्या नाराजीचा सामना करणाऱ्या सरकारला आता निसर्गाने पण झोडपून काढायला सुरुवात केली आहे. २५ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. २५ सप्टेंबरच्या संध्याकाळी अचानक वीज आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), पालघर (Palghar), शहापूर (Shahapur) ला तुफान पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईत घाटकोपर, कांजूर मार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचले व रेल्वे ठप्प झाली. कुर्ला, चेंबूर परिसराचे अक्षरश: तलाव झाले होते. त्याचा परिणाम रस्ते वाहतूकीवर झाला व रेल्वे बंद आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना कोणी वाली उरला नाही.

पश्चिम उपनगरात जाणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली त्यामुळे तासन-तास खोळंबा झाला. त्यातच सायनचा रेल्वे पुल कामासाठी बंद आहे. त्यामुळे पूर्व उपनगरात जाणाऱ्या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. वांद्रे, बीकेसी (BKC) कडून पूर्व द्रुतगती मार्गाकडे येणारे धारावी आणि बीकेसी, कुर्ला या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ज्या प्रवासाला पंधरा मिनिटे लागतात तिथे दोन ते तीन तास खोळंबा झाला होता. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले होते त्यामुळे अधिकच त्रास सहन करावा लागत होता. वांद्रे ते ठाणे हा अर्ध्या तासाचा प्रवास पुर्ण करण्यासाठी तब्बल साडेतीन ते चार तास लागले. अचानक आलेल्या पावसाने मुंबईची काही तासात दाणादाण उडवली. रिक्षा नाही, बस नाही ओलाने अव्वाच्या सव्वा भाडे सांगायला सुरुवात केली त्यामुळे रस्त्यावरुन चालत लोक घराकडे जात होते.

विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections) तोंडावर आहेत. सरकार विरोधात अनेक मुद्दे राज्यात उभे ठाकले आहेत. मराठा, ओबीसी आणि धनगर या सर्वात मोठ्या समाजांच्या आरक्षणाचे मुद्दे पेटले असून सरकारची न भूतोन भविष्यती अशी कोंडी झाली आहे. त्यातच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, बदलापूर येथील घटना घडली यामुळे सरकारचे पाय अधिकच खोलात गेले. त्यातच आता पावसाने सर्वच महाराष्ट्रात पुन्हा जोर धरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसह पुणे, मुंबईकरांना त्याचा फटका बसला आहे. तळ कोकणात, पालघरमध्ये दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस कोसळला, पिकांचे नुकसान झाले, रस्ते वाहून गेले, घाट बंद पडले तर राज्याच्या अन्य भागात ही पाऊस असाच कोसळतो आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा करतो आहे. पण आता लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासून राज्याच्या तिजोरीत उंदीर फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईत रेल्वेचे टाईमटेबल कोलमडले की मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले, विषेशत: फ्री वेचे तलाव झाले होते तर बीकेसीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. पोलीस रस्त्यावर नव्हते, पालिकेची यंत्रणा गायब होती. ट्रॅफिकमध्ये अडकलेले लोक हताश, हतबल झाले होते. मदतीसाठी कोण येईल का? याची वाट पाहत होते. सगळ्यात शरमेची बाब म्हणजे कुर्ला परिसरात पुलावर वाहतूक कोंडीत चार तास अडकलेल्यांपैकी काही ठिकाणी महिलांना रस्त्यावरच गाडीलगत कपड्याचा आडोसा करून दुर्दैवाने लघवी करावी लागत होती. वृध्द होते, मुले रडत होती. पाणी संपले होते, गाड्या बंद पडल्या होत्या, काही जणांचे इंधन संपले होते. देशाच्या आर्थिक राजधानीत हे चित्र २५ सप्टेंबरच्या रात्री ज्यांनी पाहिले ते प्रचंड संतापले होते. रात्र वैऱ्याची होती जे या सगळ्यात फसले होते, त्यांना 26 जुलैच्या पुराची आठवण झाली असावी. त्यामुळे या सगळ्याचा रोष सरकारला सहन करावा लागणार आहे. पालिकेचे दावे सगळे फोल ठरलेत, मिठी नदीवर खर्च केलेले 1500 कोटी रुपये वाया गेलेत. त्यामुळे एकूणच पावसाने केलेले नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकार आणखीनच खड्ड्यात जाणार आहे. परतीचा पाऊस बहुतेक युती सरकारची दाणादाण उडवून टाकेल असे वाटतेय.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या कुटुंबीय आणि वकिलाच्या जीविताला धोका, पोलीस संरक्षणाची केली मागणी

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी Mahavachan Utsav चे आयोजन, उत्सवांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version