‘प्रदेशाध्‍यक्ष विथ डिफरंट पार्टी’, बापाचा जुगार आणि मुलाची दारु…पक्षाला चालते तरी कशी?

‘प्रदेशाध्‍यक्ष विथ डिफरंट पार्टी’, बापाचा जुगार आणि मुलाची दारु…पक्षाला चालते तरी कशी?

पार्टी विथ डिफरंट अशी शेकी मिरवणा-या भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकदा जुगार खेळण्‍यावरुन चर्चेत आले होते तर आता मुलाच्‍या हिट अॅण्‍ड रन प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्या दिसण्‍यावरुन त्‍यांना आरडी बर्मन म्‍हणून भाजपा पदाधिकारी ओळखतातच पण सध्‍या भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष विथ डिफरंट पार्टी अशी त्‍यांची नवी ओळख प्रस्‍थापित झाली आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या मर्जीतील म्‍हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले खरे पण अधिकार न दिल्‍यामुळे आपण या राजकीय पटावर केवळ कटपुतळी बाहूले आहोत हे लक्षात येताच बावनकुळे गायब झाले. त्‍यामुळे गेले अनेक महिने भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेमके कुठे आहेत असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत ते हळूहळू गायब झालेच होते. लोकसभा निवडणुकीत दारुन पराभव झाल्‍यानंतर केंद्रीय भाजपाने महाराष्‍ट्रासाठी भूपेंद्र यादव आणि अश्‍वि‍नी वैष्‍णव यांची प्रभारी म्‍हणून नियुक्‍ती केली. या दोघांनी बावनकुळे यांचे होते नव्हते ते पुर्ण अधिकार काढून घेतले त्‍यामुळे बावनकुळे प्रदेश कार्यालयात येणेच बंद झाले. आपल्‍या विधानसभा मतदारसंघात ते आमदार म्‍हणून गेले काही दिवस निवडणुकीची तयारी करीत होते. त्‍यातच नागपूर येथे त्‍यांच्‍या मुलाच्‍या गाडीचा अपघात झाला आणि बावनकुळे अचानक चर्चेत आले.

चंद्रशेखर बावनकुळे सन 2014 च्‍या देवेंद्र फडणवीस यांच्‍या सरकारमध्‍ये ऊर्जा मंत्री होते. जागेवर धडाकेबाज निर्णय घेतल्यामुळे ते लोकप्रिय झाले होते. त्‍यांची कारकीर्द ऐन भरात असताना भाजपाने 2019 च्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍यांचे तिकिट कापले. त्‍यामुळे मंत्री पदावरुन थेट घरी बसण्‍याची वेळ त्यांच्यावर आली होती. ओबीसी समाजातून आलेल्‍या बावनकुळे यांना अशा प्रकारे तडकाफडकी घरी बसवल्‍यास ओबीसी समाज नाराज होईल व विधानसभेत भाजपाला विदर्भात फटका बसेल असे महाराष्‍ट्र भाजपातील नेते दिल्‍लीला सांगत होते पण दिल्‍लीने ऐकले नाही. बावनकुळे यांनी मंत्रीपदाच्‍या काळात कोणतीतरी एक चूक केली होती त्‍यामुळे त्‍यांना पक्षाने 420 होल्‍टचा झटका दिलाच. त्यानंतर ते शांत राहिले त्‍यामुळे पुन्‍हा त्‍यांना महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त करुन पुर्नवसन करण्‍यात आले. प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍यानंतर ते चर्चेत आले ते त्‍यांनी परदेशात खेळलेल्‍या जुगारामुळे. मकाऊ येथील कसिनोमध्‍ये जुगार खेळतानाचे त्‍यांचे फोट व्‍हायरल झाले त्‍यामुळे ते अडचणीत आले होते पण ते प्रकरण शांत झाले तसे बावनकुळेही थंड होत गेले.

केंद्रीय अध्‍यक्ष म्‍हणून अमित शाह यांनी पदभार स्विकारल्‍यानंतर देशभर भाजपाचा संघटनात्‍मक एक नवा दौर सुरू झाला होता. देशभर त्‍यांनी संघटन मजबूत केले त्‍याच लाटेत महाराष्‍ट्रात ही भाजपाचे संघटन मजबूतीने उभे राहिले. देवेंद्र फडणवीस हे सरकार येताच 2014 ला मुख्‍यमंत्री झाले पण संघटनेचा रिमोट कंट्रोलही आपल्‍याच हाती त्‍यांनी ठेवला व आपल्‍या सोयीच्या माणसाला प्रदेशाध्‍यक्ष केले. मग त्‍यामध्‍ये रावसाहेब दानवे, चंद्रकात पाटील व आता बावनकुळे यांना प्रदेशाध्‍यक्ष करण्‍यात आले. या काळात संघटनेच्‍या बांधणीला उतरती कळा लागली. त्‍याचे शेवटचे टोक बहूतेक चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍या काळात संघटन गाठेल अशी राज्‍यातील भाजपाची सध्‍याची स्‍थ‍िती आहे. महाराष्‍ट्रातील भाजपामध्‍ये पक्षाबाहेरुन आलेले नेते आजही संघटनेच्‍या मुळ कार्यकर्त्‍यांना भाव देत नाही. नवी मुंबई, सिंधुदुर्ग, नगर, इंदापूर, नांदेड, बारामती, पुणे, ठाणे या सगळया ठिकाणी भाजपाच्‍या मुळ कार्यकर्त्‍यांमध्‍ये प्रचंड नाराजीची अस्‍वस्‍था आहे. नवी भाजप आणि जुनी भाजप असे संघटनेत दोन गट निर्माण झाले आहेत. त्‍यामुळे कॉंग्रेस पध्‍दतीने आपल्‍याच पक्षाच्‍या उमेदवाराची कन्‍नी कापण्‍याचे काम पक्षातच केले जाते. याचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत बसला. भाजपा कार्यकर्त्‍यांना आपल्‍या व्‍यथा मांडता येत नाहीत. बावनुकळे यांना सांगितले तर त्‍याचा काही उपयोग होत नाही.

महाराष्‍ट्र भाजपामध्‍ये संघातून आलेले संघटनमंत्री नाहीत. देवेंद्र फडणवीस वेळ देत नाहीत. त्‍यातच आता मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या पदाधिका-यांशी जुळवून घ्‍यावे लागते. त्‍यातून काही राजकीय अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. त्‍यामुळे भाजपा कार्यकर्त्‍यांचे मनोबल खचले आहे. अशावेळी प्रदेशाध्‍यक्षाने भेटून संवाद साधून मनोबल वाढविण्‍याचाी गरज असते. पण बावनकुळे यामध्‍ये सपशेल फेल गेले आहेत. भूपेंद्र यादव यांनी प्रभारी म्‍हणून पदभार स्वि‍कारताच संघटनेचा ताबा घेतल्‍यामुळे बावनकुळेही हतबल झाले व त्‍यांनी नागपूरचे विमान पकडले व शांतपणे मतदार संघात काम करत होते. ‘झाकली मुठ सव्‍वा लाखाची’ असा पवित्रा घेऊन बावनकुळे असतानाच त्‍यांच्‍या मुलाने नवे झेंडे फडकवले व बुडत्‍या गलबताला जोरदार झटका देऊन आणखीनच खोलसमुद्रात ढकलण्‍याचे काम त्‍याने केले. संकेत बावनकुळे यांच्‍या महागडया गाडीचा अपघात झाल्‍यानंतर आता त्‍याला वाचवण्‍यासाठी बावनकुळे धावाधाव करत असून त्‍या अपघाताला थेट तो जबाबदार नसला तरी ती गाडी त्‍यांचीच होती आणि अपघात झाला हे मात्र उघड झाले आहे. विरोधकांनी मुलगा ज्‍या बारमध्‍ये नेहमी बसतो त्‍या बारमधील सीसीटीव्‍ही फुटेज काढून बावनकुळे यांची बदनामी करायची ती केलीच. त्‍यामुळे बाप चर्चेत आला होता जुगारामुळे तर मुलगा चर्चेत आला दारुमुळे, त्‍यामुळे पाटी विथ डिफरंट असा तोरा मिरवणा-या पक्षाला हे चालते का… कुठल्‍याही बाबतीत रोमॅटिक नसलेल्‍या आणि प्रॅक्‍टीकल असणा-या देवेंद्र फडणवीस यांना हे कसे चालते असा सवाल आता महाराष्‍ट्र विचारत आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version