कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण?

कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण?

माता जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी आणि यांच्यासारख्या असंख्य कर्तबगार, पुरोगामी विचारांच्या महिलांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजपर्यंत मुख्यमंत्री पदी महिला विराजमान होऊ शकली नाही. आता जेव्हा लाडकी बहिण योजना आणलीच आहे तेव्हा एखाद्या लाडक्या बहिणीला ही संधी मिळणार का? असा विषय आता चर्चेत आला आहे. मग कोण होणार मुख्यमंत्री? लाडका भाऊ की लाडकी बहीण? हे मात्र महाराष्ट्राची जनताच ठरवणार आहे. जनतेच्या मनात काय सुरु आहे याचा अंदाज अद्याप कुणालाच आलेला नाही.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळण्याबाबत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या विषयाला तोंड फोडलं. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर मला फारच आनंद होईल. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. आता 50 टक्के आरक्षण आपण लागू केलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचं आघाडीवर आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रीपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आहेत. आमच्या काँग्रेस पक्षात सुद्धा महिला आहेत. शेवटी याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी ठरवत असतात, असे मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते.

त्याचवेळी भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केले. अमृता देवेंद्र फडणवीस या ज्या पध्दतीने सामाजिक काम करीत आहेत ते पाहता त्यांना अमृता भाभी नाही तर अमृता माँ म्हणायला हवे. त्यांनी ज्या पद्धतीने चौपाटीवर साफसफाई केली त्याचप्रमाणे राजकारणात येऊन राजकारणातील घाण साफ करावी, अशी इच्छा ही लोढा यांनी व्यक्त केली आहे. तर वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर उबाठा गटातून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवून रश्मी वहिनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला पक्षच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे याआधीच जाहीर केले आहे. पण वर्षा गायकवाड यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावे चर्चेत आणली खरी. तर सुप्रिया सुळे यांचे नाव गेले अनेक वर्षे चर्चेत आहेच. काँग्रेसमध्ये सुध्दा इच्छुक आहेत. त्यामुळे यात खरी गंमत आणली ती मंगलप्रभात लोढा यांनी खरं तर रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस या दोन नावांमुळे या चर्चेला सेलिब्रिटी स्वरूप आले आहे.

रश्मी ठाकरे यांनी कधीच राजकीय भाष्य अथवा विधान केलेले नाही पण त्या सदैव माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत दिसतात. तर अमृता फडणवीस या गेले काही दिवस सामाजिक संघटना चालवून आपले संघटन बांधत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपातील काही पदाधिकारी हाताशी धरून अमृता फडणवीस गेले काही वर्षे विविध सामाजिक काम करीत आहेत. कोरोना काळात धारावीत ही त्यांनी काम केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता फडणवीस यांनी निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इच्छा व्यक्त केली आहे. देवेंद्र भोळे आहेत. त्याच्या पेक्षा मला संधी द्या, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे. तोच धागा पकडून मंगलप्रभात लोढा यांनी विधान केले असावे, असा राजकीय जाणकार कयास व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बाहेरील जगात लोढा यांच्या विधानाला फारसे महत्त्व दिले गेले नाही तरी भाजप आणि संघ वर्तुळात या विधानाने खळबळ माजली आहे.

लोकसभा निवडणुकीत मंगलप्रभात लोढा दक्षिण मुंबईतून लढण्यास इच्छुक होते त्यासाठी त्यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती पण ही जागा शिंदे गटाला सोडून भाजपाने लोढा यांचा पत्ता कट केला होता. तोच राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या बाबत हे विधान केले आहे असे जाणकार सांगतात. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पक्षात प्रचंड नाराजी आहे त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. कारण संघ आणि मोदींची भिती आहे. पण लोढा यांनी धाडस केले आपल्या मनातील नाराजीला मखमली खलिता लावून त्यांनी वाचा फोडली असेही बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मुख्यमंत्री पदाचे दावेदार खूप आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे महिला शक्तीचा विषय चर्चेत आहे. त्यामुळे महिला मुख्यमंत्री अशी एक नवी पुडी सोडली गेलीय खरी पण महाराष्ट्राने ठरवलेच तर तशी राजकीय अपरिहार्यता लाडक्या भावांसमोर उभी राहू शकते आणि एखादी लाडकी बहिण मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ ही शकते.

हे ही वाचा:

One Nation, One Election: केंद्र सरकारने उचललेले पाऊल क्रांतिकारक ठरणारे, निर्णयाचा विरोध करणे योग्य नसल्याचे CM Shinde यांचे मत

गायक हिमेश रेशमियावर कोसळला दुःखाचा डोंगर, ८७ वर्षी वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version