spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ashadhi Ekadashi 2024: आषाढीच नव्हे तर ‘या’ वारी आहेत तितक्याच महत्त्वपूर्ण

अनेक भाविकांना विचारले की पंढरपूरच्या किती वाऱ्या असतात तर याचे योग्य उत्तर कदाचित त्यांना देता येणार नाही. कारण वारीशी संबंधित संपूर्ण माहिती ही अनेकांना माहिती नसते.

आषाढ महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या निघून पंढरपूरकडे प्रस्थान होतात. या काळात दिंड्या, टाळ आणि मृदूंगासह विठूच्या नावाचे गजर करत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जातात. यंदा आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा १७ जुलै रोजी असणार आहे. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

अनेक भाविकांना विचारले की पंढरपूरच्या किती वाऱ्या असतात तर याचे योग्य उत्तर कदाचित त्यांना देता येणार नाही. कारण वारीशी संबंधित संपूर्ण माहिती ही अनेकांना माहिती नसते. त्यामुळेच वर्षभरात आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या दोनच वाऱ्या असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु, वर्षभरात साधारण चार वेळा वारी केली जाते. जशी आषाढी आणि कार्तिकी वारी असते, तशीच चैत्र आणि माघ वारीही असते. आज आपण चार वाऱ्यांबद्दल माहिती घेणार आहोत. पंढरपूर हे असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे, जेथे वर्षातून चार वेळा यात्रा भरते. चैत्र यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्रा. पश्चिम, भारतातील पंढरपूर हे एक सर्वात प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तेथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थानही आहे.

चैत्र यात्रा

भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे. चैत्र शुद्ध एकादशीस ‘कामदा एकादशी’ म्हणतात. चैत्र शुद्ध एकादशीस पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा होते. चंद्रभागा स्नान, विठ्ठलाचे दर्शन, क्षेत्र प्रदक्षिणा आणि भजनात तल्लीन होऊन भाविक मंडळी स्वतःला कृतार्थ करतात.

आषाढ यात्रा

आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी किंवा विष्णुशयनी एकादशी’ असे म्हणतात. या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण (श्री विठ्ठल) आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासून चातुर्मासाचे व्रत आरंभ होते.

कार्तिक वारी

कार्तिक शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात मोठी यात्रा असते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘उत्थान एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी शयनी गेलेले भगवंत उठतात. या एकादशीनंतर संत आणि चातुर्मासात थांबलेले लोक आपापल्या गावी परत जातात. या यात्रेनंतर चातुर्मास पूर्ण होतो. या एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरणही केले जाते.

माघी यात्रा

पंढरपुरात ही क्रमांक चारची महत्वपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा माघ शुद्ध एकादशीस भरते. माघ शुद्ध एकादशीस ‘जया एकादशी’ असेही म्हणतात. या यात्रेला कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातून दिंडया येतात. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भारतातील विविध प्रांतातील भाविकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्र आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तसेच धर्मसंस्कृतीचे हे एक प्रतीक आहे.

VISHALGAD ENCROACHMENT: जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय…Narayan Rane यांची पोस्ट चर्चेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss