Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरातच नाही तर ‘या’ मंदिरातदेखील झाली भाविकांची अलोट गर्दी

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात.

Ashadhi Ekadashi 2024: पंढरपुरातच नाही तर ‘या’ मंदिरातदेखील झाली भाविकांची अलोट गर्दी

आज १७ जुलै बुधवारी आषाढी एकादशी आहे. या दिवशी अनेक विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदाय पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी वारकऱ्यांच्या दिंडीसोबत नाचत-गात, टाळ-मृदूंगासोबत विठ्ठलाचे नामस्मरण करतात. आषाढ महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या निघून पंढरपूरकडे प्रस्थान होतात. या काळात दिंड्या, टाळ आणि मृदूंगासह विठूच्या नावाचे गजर करत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जातात. ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक आपापल्या भागातील विठुरायाचे प्रतिरूप असणाऱ्या मंदिरात दर्शनाला जातात.

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेले आहे. आज शेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. पंढरपूर येथे शेगाव संस्थानच्या शाखांमध्ये सुध्दा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संतनगरीत श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात. हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे. पंढरपूरला जाता न आल्याने आज शेगावात दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे.

ज्या भाविकांना पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही ते भाविक, भक्त, वारकरी मराठवाड्याची प्रति पंढरपूर नगरी तसेच छोटे पंढरपूर वाळूज येथे येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतात. आज प्रति पंढरपूरात विठुरायांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने ही योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून 64 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे परिसरात बसविण्यात आले आहेत. दोन अत्याधुनिक ड्रोनद्वारे गर्दीवर सुद्धा लक्ष ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविक प्रति पंढरपूर येथे दिंडी तसेच पालख्या घेऊन दाखल होत आहेत आणि विठुरायांचे दर्शन घेत आहेत.

Exit mobile version