Ashadhi Ekadashi 2024:आषाढी वारी कधी आणि कोणी सुरु केली? जाणून घ्या सविस्तर माहिती

एका सिद्धांतानुसार श्री संत ज्ञानेश्वर माउलीचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरु केली. तब्बल ८०० वर्षांहून अधिक काळापासून वारीची परंपरा असल्याचे सांगितले जाते.

Ashadhi Ekadashi 2024:आषाढी वारी कधी आणि कोणी सुरु केली? जाणून घ्या सविस्तर माहिती

आषाढ महिना आला की ओढ लागते ती पंढरीच्या वारीची आणि आषाढी एकादशीची. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या निघून पंढरपूरकडे प्रस्थान होतात. या काळात दिंड्या, टाळ आणि मृदूंगासह विठूच्या नावाचे गजर करत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जातात. यंदा आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त हा १७ जुलै रोजी असणार आहे. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

पंढरपूरच्या वारीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं स्थान आहे. वारी ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन एकादशींना होत असते. एका सिद्धांतानुसार श्री संत ज्ञानेश्वर माउलीचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरु केली. तब्बल ८०० वर्षांहून अधिक काळापासून वारीची परंपरा असल्याचे सांगितले जाते. हिंदू वर्षानुसार आषाढ शुक्ल एकादशीच्या वेळी राज्यातील अनेक दिंड्या या खेड्यापाड्यातून, शहरातून विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असत. संत ज्ञानेश्वरांचे वडील सुद्धा वारीला जात असे. पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे लोक पायी पंढरपूरला जात असे. तीच परंपरा आजही सुरु आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. वारकरी पायी चालताना विठ्ठलाची भक्तीगीते गायन, नृत्य आणि टाळ नाद करत वारीचा आनंद घेत असतात.

इ.स १६८५ मध्ये श्री संत तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी संत तुकोबारायांच्या व संत ज्ञानेश्वरांच्या पालखीला ओळख दिली. नारायण बाबा यांनी संत तुकोबारायांच्या व संत ज्ञानेश्वरांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला घेऊन गेले. ही परंपरा १९३० पर्यंत सुरु होती. परंतु नंतर काही वादांमुळे पालख्या पुन्हा वेगवेगळ्या करण्यात आल्या. दरवर्षी आषाढी वारी निमित्त संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीप्रमाणे हजारो दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये जाण्याआधी वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटून त्याच दिवशी संध्याकाळी सर्व वारकरी आपापल्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात.

Exit mobile version