Champa Shashthi 2022 : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्यांचा महिना मानले जाते. हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते.

Champa Shashthi 2022 : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’,  जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्याला व्रत वैकल्यांचा महिना मानले जाते. हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे. या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठी व्रत केले जाते. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते. यंदा २९ नोव्हेंबर मंगळवार रोजी चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीचे नेमके महत्त्व काय अन् हा दिवस कसा साजरा केला जाता याबद्दल आपण जाणून घेऊया.

आज, मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी (Champa Shashthi 2022) आहे. दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला साजरा केला जातो. आज पूजेत वांगी अर्पण केली जातात, म्हणून याला ‘वांगे छठ’ असेही म्हणतात. चंपाषष्ठी व्रत दोन शब्दांनी बनलेले आहे. एक चंपा आणि दुसरी षष्टी. या दिवशी भगवान शंकराचे स्वरूप खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटकात हे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा (Khandoba) मानले जाते, त्यामुळे हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

पौराणिक कथेनुसार, मणिसुर आणि मल्लासुर या दोन राक्षसांनी मानव, देव आणि ऋषींना खूप त्रास दिला. असुरांचा त्रास असहय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला. त्यानंतर भगवान शंकराने भगवान खंडोबाचे रूप धारण केले, त्यानंतर मणि आणि मल्ल यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान शिवाची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. असुरांवरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिक दृष्ट्या साजरी केली जाते.

खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत –

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे उत्सवात साजरे करण्याचे नवरात्रीप्रमाणे व्रत असते. जेजुरीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत आहे. घरोघरी नवरात्रोत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो. घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात. सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो

सहा दिवस तेलाचा दिवा –

चंपाषष्ठीला विशेष महत्त्व असून या दिवशी खंडेरायाची पूजा केली जाते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरात मार्तंडभैरव षड् रात्रोत्सव साजरा केला जातो. अमावास्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते.

चंपाषष्ठी म्हणजे त्रासापासून मुक्‍तीचा दिवस –

चंपाषष्ठी म्हणजे, त्रासापासून मुक्‍तीचा दिवस. आनंदाचा दिवस. चंपाषष्ठी यात्रेसाठी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. यात्रेत भाविकांची मोठी रांग लागते. घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्‍साहाने सोहळ्यात सहभागी होतात. चंपाषष्ठी निमित्त जेजूरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो. शारदीय आणि चैत्र नवरात्री प्रमाणेच या मल्हारी किंवा खंडोबा नवरात्री मध्येदेखील घटस्थापना करण्याची, प्रत्येक दिवशी एक एक माळ वाढवण्याची प्रथा आहे.

‘तळी भंडारा’ – एक कुळाचार –

भगवान महादेवाचे अवतार खंडोबा यांनी ‘मणि आणि मल्ल’ या दैत्यांचा पराभव केला होता. त्यामुळे ऋषिमुनीं आनंदी झाले, मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला होता. त्याचेच प्रतीक म्हणजे ‘तळी भंडारा’ मानले जाते. त्यामुळे चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते. हा एक कुळाचार मानला जातो. ताम्हणात विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर जमीनावर पान ठेवून तळी ठेवली जाते. देवाला भंडार वाहिला जातो. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोटच्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. आरती करून भंडारा आणि गुळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो.

पाच दिवसांच्या उपासनेनंतर सहाव्या दिवशी म्हणजे आज हा उपवास सोडायचा दिवस आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रासह जेजुरीमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर दुमदुमत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. पण यावर्षी जेजूरी गडावर अगदी धुमधडाक्यात चंपाषष्ठी साजरी होत आहे.

हे ही वाचा:

‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

Esha Gupta ईशा गुप्ताचे क्लासी आणि बोल्ड फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version