spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आली गौर आली… आज शुभ मुहूर्तावर करा गौरी आवाहन

घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. आज दि. ३ सप्टेंबर म्हणजेच ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (Gauri Pujan 2022) करतात.

घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. आज दि. ३ सप्टेंबर म्हणजेच ज्येष्ठागौरी आगमनाचा दिवस आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (Gauri Pujan 2022) करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.

गौरीला पार्वतीचे शक्तीरूप मानले जाते आणि पार्वती ही बाप्पाची आई आहे. तर काही ठिकाणी गौराईना बाप्पाची बहीण मानले जाते. भावा सोबत बहीण माहेरी आली असे समजले जाते. माहेरच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे दुसरे सुख नाही त्यामुळे माहेरपण अनुभवायला बाप्पा बहिणीला घेऊन येतो असेही म्हटले जाते. दोन गौराई असतात. एक असते जेष्ठा तर दुसरी कनिष्ठ. तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात. एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो.

अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीपूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. गणपती हे पूर्णपणे शाकाहारी त्यामुळे मातोश्रींना जरी मांसाहार चालत असला तरी तो मुलाच्या म्हणजे गणपतीच्या दृष्टीस पडू नये म्हणून गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखविताना मध्ये पडदा धरण्याची प्रथा आहे. आपण देवावर आपल्या भावभावना लादतो, देवही आपल्यासारखाच आहे अशी समजूत बाळगतो. गणपतीसारखा त्रिखंडमान्य महान् ब्रह्मदेवता पुत्र असला तरी मातेला ‘तिखट’ खाण्याची इच्छा होते. ती इच्छा भक्तमंडळी पुरवितात आणि तरी पुरवीत असताना मातेचा आहार मुलाच्या नजरेला पडू नये म्हणून सावधगिरी बाळगतात.

गौरीपूजन गणपती बाप्पाच्या आगमनानंतर साजरा केले जाते. गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते. ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांनी अनुराधा नक्षत्रवर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल. गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.

४ सप्टेंबरला रविवारी गौरीपूजन ज्याला आपण गौरी जेवतात असं म्हणतो तो रविवारचा दिवस आहे. ५ सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असल्याने रात्री ८ वाजेपर्यंत कधीही आपल्या सोयीने गौरी विसर्जन करू शकता.

हे ही वाचा:

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

गौरीपूजनास महालक्ष्मी पूजन देखील म्हणतात, जाणून घ्या गौरी आगमनाबद्दल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss