spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sankashti Chaturthi 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे. संकष्टी चतुर्थी, ज्याला संकटहार चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो (अंधकारमय चंद्र चरण किंवा चंद्राचा अस्त होणारा पंधरवडा). ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या संकष्टी चतुर्थी विषयी माहिती जाणून घेऊयात .

  • या दिवशी व्रत कसा केला जातो ?

संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत दोन प्रकारांनी करतात. १. मिठाची संकष्ट चतुर्थी व २. पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे.या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे. या दिवशी भाविक कडक उपवास करतात. गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन/शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात. चंद्रप्रकाशापूर्वी, गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. माघ महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी “सकट चौथ” म्हणूनही साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यात गणेशाची पूजा वेगळ्या नावाने आणि पिठाने (आसन) केली जाते. प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ‘संकष्ट गणपती पूजा’ केली जाते. प्रत्येक व्रताचा (कठोर उपवास) एक उद्देश असतो आणि ते व्रत कथेद्वारे स्पष्ट केले जाते. या प्रार्थना अर्पण मध्ये १३ व्रत कथा आहेत, प्रत्येक महिन्यासाठी एक कथा आणि १३वी कथा अधिकमासासाठी असते. (हिंदू दिनदर्शिकेमध्ये अंदाजे दर ३ वर्षांनी एक अतिरिक्त महिना असतो). 

  • हा उपवास का केला जातो ? 

या महिन्यात बुधवारी २४ जुलै रोजी संकष्ट चतुर्थी आहे. रात्री ०९. ४८ मिनिटांनी चंद्रोदय आहे. सगळे भाविक चंद्र दर्शन घेऊन मगच संकष्टीचा उपास सोडतात. पण या प्रथेचे आपण पालन का करतो आणि चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडतो, ते जाणून घ्या आणि उपास सोडण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून करा.अलीकडे संकष्ट चतुर्थी करणारे बरेच लोक आहेत. कलियुगामध्ये गणपतीची व देवीची उपासना वाढेव व ती फलद्रुप होईल. ‘कलौ चंडी विनायकौ’ असे समर्थांनी म्हटले आहे, तसे दृश्य आता दिसू लागले आहे. समर्थांचे ते वचन खोटे ठरणारे नाही. लोकांची श्रद्धा उत्तरोत्तर वाढत आहे.

दुसरे म्हणजे या मनस्वी धकाधकीच्या जीवनात लोकांना मनःशांतीसाठी दुसरी जागा व मार्ग नाही. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात गेले पाहिजे, काही उपासना केली पाहिजे, हे लोकांना आता पटत आहे. चतुर्थी कशी असावी? अनेकांना प्रश्न पडतो, की संध्याकाळपर्यंतच काय सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते. तर या दिवशी संकष्टी का? उपासना तर तृतीयेमध्ये होते. तरीही संकष्टी त्याच दिवशी करायची असते. हे व्रत चतुर्थी प्रधान आहे. याबाबत पुराणात एक कथा आहे.

  • या उपवासाची पौराणिक कथा काय ?

गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उःशाप दिला, की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपास सोडणार नाही. गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर काहीच नाही, तर निदान भात खाऊन उपास सोडावा. असे संगितले जाते.

  • हा उपवास कसा सोडावा ?

उपास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्र दर्शन घ्यावे. गणेशाचे दर्शन घ्यावे. त्याला दुर्वा व फुले वाहावीत. मुख्य म्हणजे गणपतीची आरती म्हणावी. मोदकांचा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवावा. संकष्ट चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा. या सर्व गोष्टी केल्याशिवाय गणेश उपासना पूर्ण होणार नाही. त्यामुळे संकष्टीला, रात्री ०९. ४८ मिनिटांनी चंद्रोदय होईल. तेव्हा चंद्रदर्शन घ्यायला विसरू नका आणि वर दिलेल्या बाबी पूर्ण करा.

हे ही वाचा:

BUDGET SESSION OF PARLIAMENT : MODI GOVERNMENT चा आज ३ऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प होणार जाहीर..

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रसरकासरची इंटर्नशिप योजना नेमकी काय आहे.. ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss