Shardiya Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं कुठे आहेत? जाणून घ्या सविस्तर

नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत.

Shardiya Navratri 2024: महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं कुठे आहेत? जाणून घ्या सविस्तर

यंदा नवरात्री उत्सव गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण नऊ दिवस दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव माता दुर्गाच्या ९ अवतारांसाठी आहे, ज्यांची दररोज पूजा केली जाते. ते मानले जाते की, या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांचे रक्षण करते. नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत.

महाराष्ट्रातील ही सर्वच देवस्थळं जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात या ठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. या साडेतीन शक्तिपीठ कुठे आहेत आणि त्याची माहिती  आम्ही नवरात्रीच्या निमित्ताने खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर

महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स.६०० ते ७०० मध्ये बांधले असल्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीच शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. महालक्ष्मी ही विष्णूची भार्या आणि म्हणून समोर गरुडमंडपात विष्णूवाहन गरुडाची स्थापना केली. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे . डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

तुळजापूरची भवानी आई मंदिर

भारतातील शक्तिदेवताच्या पीठांपैकी साडी तीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली आहे. स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तालावर दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

माहूरची रेणुकामाता मंदिर

माहूर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथील पिठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे ते म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी काही भाविकांची श्रद्धा आहे.

नाशिकची सप्तशृंगीदेवी मंदिर

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगीगड. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रुपाशीच नाते सांगणारी आहे असे वाटते. देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यावर तेथे देवीची मूर्ती सापडली अशीही एक दंतकथा आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती असे म्हटले जाते.

हे ही वाचा:

महायुतीत जागावाटपावरून वाद! रामदास आठवले यांनी इतक्या जागांची यादी दिली भाजपला आणि…

Shardiya Navratri 2024: नवरात्री का साजरी केली जाते? काय त्याचे महत्त्व? जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version