Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राशी भविष्य २५ सप्टेंबर २०२२, आज समस्त पितरांच्या स्मरणाचा दिवस ….

आज समस्त पितरांच्या स्मरणाचा दिवस आहे. तरी आपण सर्वांनी त्यांचे स्मरण करून आजच्या दिवसाची सुरुवात करावी.

मेष:- आजचा दिवस सामान्य आहे. बौद्धिक पातळीमध्ये आमूलाग्र बदल दिसून येतील. संवादातून विसंवादाकडे वाटचाल होत तर नाही ना याची काळजी आवश्य घ्यावी. दिवसाचा उत्तरार्ध लाभदायक आहे. व्यवसायात आपला दबदबा कायम राहील. शैक्षणिक – व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची घोडदौड चालूच राहील.

वृषभ:- आजचा दिवस आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा दिवस आहे. कोणावरही अन्याय होत असेल तर आपण अशा विषयात स्वतःहून सहभागी होऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कराल. लॉटरी किंवा तत्सम मार्गाने अचानक धन लाभ होतील. शक्यतो अमावस्येला प्रवास वर्ज्य मानला जातो मात्र आज आपल्याला विपरीत अनुभूती येईल. आपण केलेला प्रवास कार्यसाधक होतील.

मिथुन:- आजची ग्रहस्थिती आपणास पूरक असल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली अनेक कामे मार्गी लागतील. शरीर पीडा कमी होऊन आरोग्य उत्तम राहील. आपल्या सहकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळाल्याने कामकाजात उत्साह वाढेल. तुम्ही केलेला संकल्प सिद्धीस नेण्यात आपण यशस्वी व्हाल.

कर्क:- अनेक दिवसापासून होत असलेला विसंवाद संपुष्टात येऊन मनोवांछित सुखाची अनुभूती मिळेल. आप्तेष्ठांमध्ये झालेल्या स्नेहवर्धनामुळे वातावरण आनंदी बनून राहील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळून आर्थिक लाभ देखील वाढतील. पूर्वजांच्या स्मृतीला दिलेला उजाळा आपणास ऊर्जावर्धक राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याने तुम्हाला लाभाच्या पदाची प्राप्ती होऊ शकेल.

सिंह:- आज कलागुणांना जाणणारी मंडळी तुमचे कौतुक करतील. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास कलाकारांना यश मिळेल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात मोठी झेप घ्याल. आज आपल्या मनातील सुप्त गुणांना संधी मिळून ती प्रकट करू शकाल. परिवारासाठी वेळ द्यावा लागेल.

कन्या:- आजच्या दिवसाची सुरुवात काहीशी धावपळीत होत असली तरी शुभ समाचार ऐकायला मिळाल्याने उत्साह कमी होणार नाही, तुम्ही हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. कदाचित कामानिमित्त प्रवास देखील करावा लागेल. तुमच्या समवयस्क लोकांकडून अपेक्षित साथ मिळेल. मैत्रीपूर्ण वातावरणात वाटाघाटी करण्यात यशस्वी व्हाल.

तुळ:- आजचा दिवस आपल्या विचारात देखील आलेला नसेल. आपल्याला आपले कर्तव्य करीतच रहायचे आहे याची जाणीव ठेवणे महत्वाचे आहे. अकारण खर्चात टाकणारा दिवस आहे. कामकाजविषयक महत्वाचे करार आज नकोत. बोलण्यात संयम ठेवा. विचलीत मानसिकतेमुळे व्य्वसनाधीनता वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक:- आजचा दिवस उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. तुम्ही घेतलेली मेहनत – केलेले परिश्रमाला आज फलप्राप्ती देणारा दिवस आहे. तुमच्या मनासारखी कामे होतील. मिळालेली संधी पुन्हा परत येईलच असे घडत नसते. त्यामुळे आजचा वेळ वाया घालवू नका. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखला जाईल अशी काळजी घ्या.

धनु:-आज आपणांस मानसिक आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. सद्विचारांची खाण असलेल्या मंडळींसोबत सत्संग घडेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद घडण्याची शक्यता आहे, तो टाळणे हिताचे राहील. अधिकच्या जबाबदाऱ्या पेलवण्याची मानसिक तयारी ठेवावी. आज आपण तात्कालिक विषयाला प्राधान्य क्रम दिल्यास मानसिक तणाव जाणवणार नाही.

मकर:- दूरचे नातेवाईक भेटायला येतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नात्यातून सहयोग मिळेल. ज्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत असलेली येणी वसूल होतील. वडिलोपार्जित स्थावर इस्टेट विषयक वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दत्तकविधान विषयक सकारात्मक चर्चा होईल. आपण पूर्वी केलेल्या धन संचयाचा आज उपयोग होईल.

कुंभ:- आज शाब्दिक चुका टाळाव्यात. मौनं सर्वार्थ साधनम् या श्लोकाचा वागण्यात उपयोग करा. विनाकारण वाद वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मन स्थिर ठेवा. आज आपण वाहन चालवणे टाळा. खोल पाण्याकडे किंवा अति उंच ठिकाणी जाणे टाळा. आर्थिक व्यवस्थापन उत्तम प्रकारे करू शकाल.

मीन:- आज आपणांस समाजात मान सन्मान प्राप्त होतील. कार्यालयीन कामकाज मार्गी लागण्यासाठी उत्तम सहकार्य मिळेल. आज केलेला प्रवास लाभदायक होईल. अध्यात्मिक साधनेने मनाला आत्मिक समाधान लाभेल. संगत गुणांचा दुष्परिणाम अनुभवायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी जीवनात जगणे केव्हाही उत्तम असते याची जाणीव ठेवावी.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; ‘वर्षा’ वर झाली तासभर चर्चा

शिंदे – फडणवीस सरकारने केली जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाची यादी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss