पाचव्या टप्प्यासाठी २ कोटी ४६ लाखांपेक्षा जास्त मतदार, संपूर्ण यंत्रणा तयारीसह सज्ज

मतदानापूर्वी आवर्जून या सुविधांचा लाभ घेऊन मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच ही माहिती घेतल्यास त्यांना अधिक सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता येईल.

पाचव्या टप्प्यासाठी २ कोटी ४६ लाखांपेक्षा जास्त मतदार, संपूर्ण यंत्रणा तयारीसह सज्ज
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी मतदानाविषयी मत व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते. राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३  मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले. यावेळी माहिती देताना चोक्कलिंगम म्हणाले, चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये ६२.२१ टक्के मतदान  झाले. २०१९ च्या तुलनेत या आकडेवारीत एक टक्क्याने वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आयोगामार्फत वर्षभर सुरु राहत असून पाचव्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदार यादीत २२ एप्रिल २०२४ पर्यंत नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध असून यादीत नाव असलेल्यांना मतदान करता येणार आहे. मतदारांना विनासायस मतदान केंद्र, मतदान यादीतील आपले नाव याची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत व्होटर हेल्पलाईन ॲप तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर व्होटर पोर्टल याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी अर्जामध्ये दिलेल्या प्राथमिक माहितीचा तपशील भरल्यावर त्यांना आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर, मतदार यादीत कितव्या क्रमांकावर आहे याची माहिती उपलब्ध होते. जे मतदार या दोन्ही सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी व्होटर हेल्पलाईन १९५० या क्रमांकावर देखील सुविधा उपलब्ध आहे. मतदानापूर्वी आवर्जून या सुविधांचा लाभ घेऊन मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच ही माहिती घेतल्यास त्यांना अधिक सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच ज्या मतदारांनी आपला मोबाईल क्रमांक मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेला आहे त्यांना तो नंबर टाकून किंवा मतदार ओळखपत्राचा दहा अंकी क्रमांक टाकून देखील आपले नाव शोधता येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगामार्फत घरपोच मतदान चिठ्ठी वितरीत करण्यात येत आहे. मात्र ही चिठ्ठी कुठल्याही प्रकारे मतदार ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही, असे यावेळी प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
Exit mobile version