spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला…बावनकुळेंचं ठाकरेंवर टीकास्त्र

लोकसभा निवडणूका तोंडावर असतांना काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात दिल्ली येथील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल तसेच  शरद पवार हे देखील उपस्थित होते. त्याआधी दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, सगळे ठग भाजपमध्ये गेले, त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या येण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी खर्च तयार करायला तयार आहे. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा,असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचा येण्या-जाण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी स्वतः करतो, पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन यावं, त्यांच्या सर्व खर्च मी करतो, त्यांच्या हॉटेलचा खर्च देखील मी करतो. पण त्यांनी मणिपूर आणि लडाखला जाऊन तेथील परिस्थिती पाहावी. देवेंद्र फडणवीस यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावं. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? 

देवेंद्र फडणवीस यांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही.

संजय राऊत यांचं मत काय होतं? 

भाजपची केविलवाणी धडपड सुरु आहे. खरे ठग कोण आहेत, हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यामुळे सर्वांसमोर आलेलं आहे. ठगांचा मेळा त्यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व मुख्य ठग त्यांच्याकडे गेल्यामुळे पक्ष आता मोकळा झाला अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल ठग होते, हे मी किंवा उद्धव ठाकरे यांनी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यांनी सगळे ठग घेतल्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो,असे संजय राऊत म्हणाले.
 

Latest Posts

Don't Miss