वनविभागाला मोठे यश; १३ बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

वनविभागाला मोठे यश; १३ बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

१३ व्यक्तींचा बळी घेतलेल्या सी टी१ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील जंगलात हा वाघ वावरत होता. सीटी १ (नर) या वाघाने वडसा वनविभागात ६, भंडारा वनविभागात ४ व ब्रम्हपुरी वनविभागात ३, असे एकुण १३ मानवी बळी घेतले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी दिल्या होत्या.

‘सीटी १’ या नरभक्षी वाघाने भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. ताडोबा अभयारण्यातील विशेष पथक या वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतं. परंतु तीन महिन्यांपासून हा वाघ हुलकावणी देत होता. गुरुवारी सकाळी या वाघाला पकडण्यात यश आलेलं आहे. ‘सीटी १’ या वाघाने आतापर्यंत १३ लोकांची शिकार केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक दहशतीखाली वावरत होते. दोन दिवसांपूर्वी देसाईगंज जवळच्या एका गाईवर या वाघाने हल्ला केला. त्यामुळे तेथेच वनविभागाची टीम पाळत ठेवून होती.

बुधवारी १३ तारकेला देसाइगंज लगत वळुमाता येथे वाघाने गाईला ठार केले होते. त्यामुळे या शिकारीजवळच वनविभागाच्या चमुने दुसरे सावज बांधून वाघास आकर्षित केले. रात्रभर बंकर केजमध्ये बसून अधिकाऱ्यांनी वाघावर पाळत ठेवली. गुरुवारी सकाळी हा वाघ मारलेल्या शिकारीजवळ आला. तेव्हा बंकर केजमध्ये तैनात पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलिस नाईक (शॉर्पशूटर) ए. सी. मराठे, वन्यजीव अभ्यासक राकेश अहुजा व त्यांच्या इतर टिम सदस्यांनी तात्काळ बंदुकीतून डॉर्ट मारून वाघाला बेशुध्द केले. त्यानंतर वडसा वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वाघ शुध्दीवर येण्यापुर्वी कोणतीही इजा न होऊ देता वाघाला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले. वाघाला जेरबंद केल्याची माहिती मिळताच गडचिरोलीचे वनसंरक्षक यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठवण्याबाबत वरिष्ठाचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

सी टी१ हा चार ते पाच वर्षांचा वाघ होता. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात त्याने मानवावर हल्ले केले होते. मात्र, या वाघाला जेरबंद केले म्हणून धोका कमी झाला असे नाही. अजूनही या क्षेत्रात टी ६ वाघीण आहे. काही जणांवर तिनेही हल्ले केल्याचे समोर येत आहे. या वाघीणीलाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, गडचिरोलीतील वडसा येथेही काही वाघांचा वावर आहे. त्यामुळे स्थानिकांनी अधिक जंगलात जाऊ नये. सध्या सर्वत्र हिरवळ असल्याने हे वाघ सहज दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्यामुळे ते जवळ असले तरी दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी.

हे ही वाचा :

आम्ही कुणावरही दबाव आणलेला नाही; शंभूराज देसाई

Karwa Chauth 2022 : चित्रपटांमुळे आले ‘करवा चौथ’ व्रताला ग्लॅमर रूप… ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’

Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version