spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणाच्या मुद्द्यावर अबू आझमींच मोठं विधान

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडींपैकी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबादचे’ नावं बदलून ‘धाराशिव’ करण्याचा सरकारचा निर्णय पक्षांमध्ये चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत चाललाय. तर दुसरीकडे आता या विषयाला एक धार्मिक वळण येईल की काय असं वाटू लागलंय. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. पण, त्यानंतर काही काळ या विषयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, शिंदे – फडणवीस पक्षानं सत्तेवर येताच, नामकरणाच्या या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.

शहरांची नावं बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला. पण हे केवळ ढोंग असून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आझमी म्हणाले, “देशात खूप मोकळी जमीन अस्तित्वात आहे. त्याठिकाणी नवीन शहरं बनवा आणि तुम्हाला हवं ते नाव द्या. पण त्यांना शिंदे-फडणवीस सरकारला एक संदेश द्यायचा आहे की याठिकाणी मुस्लीम नाव चालणार नाहीत.”

हेही वाचा : 

राज्यपाल हे काय सुरू आहे? ट्विटरच्या माध्यमातून राऊतांचा सवाल

पुढे त्यांनी नमूद केलं की, “औरंगजेबचा इतिहास मोडून-तोडून चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे. आज देशाला स्वातंत्र होऊन ७०-८० वर्षे उलटली आहेत. देशावर अनेक वर्षे इंग्रजांची सत्ता होती. पण हेच नाव कायम होतं. आता औरंगाबादचं नामकरण करून मतदारांचं धृवीकरण केलं जातंय. यामध्ये सर्वात जास्त नुकसान देशाचं होत आहे. देशातील २० टक्के अल्पसंख्यांकावर प्रत्येक ठिकाणी अन्याय होत आहे. त्यांना मशिदीत नमाज पठण करता येत नाहीये, मशिदीसमोर कीर्तन म्हटलं जातंय, मशिदीवरील भोंगे उतरवले जात आहेत, शहरांचं नामकरणं केलं जातंय, यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे”.

“लोकांमध्ये अविश्वास निर्माण झाल्याने देश प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडे जात आहे. शहरांची नावं बदल्याने जर देशाचा विकास होणार असेल, लोकांना नोकरी मिळणार असेल, भूक मिटणार असेल, महागाई कमी होणार असेल, तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावं बदला. पण हे केवळ ढोंग असून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. त्यामुळे मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, हे लोक देशाला बरबादीकडे घेऊन जात असून देशातील हिंदू-मुस्लीम एकता संपवत आहेत” असंही अबू आझमी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss