spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राष्ट्रपतींकडून मराठमोळे तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांचा गौरव

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी २० वर्षांचे तरुण मराठी उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्याशी राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी २० वर्षांचे तरुण मराठी उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्याशी राष्ट्रपती भवनात भेट घेतली. परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना औषध उपलब्ध केल्याने त्याचा मोठा दिलासा भारतीयांना मिळाला आणि या कार्याची पोचपावती म्हणून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व मराठमोळे उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या कार्याचे कौतुक आणि गौरव केले. या चर्चेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपांडे यांच्या देशातील १४० कोटी नागरिकांना मूळ किमतीपेक्षा ८० टक्के स्वस्त व किफायतीशीर दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे कार्य देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत क्रांतीकारी पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या या भेटीत अर्जुन देशपांडे यांनी प्रथमच द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांची प्रतिमा भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे गौरव नसून संपूर्ण भारताचे गौरव असल्याचे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे यांनी सांगितले.

भारतात कर्करोग, मधुमेह व अन्य आजाराचे लाखो रुग्ण असून या रुग्णांना स्वस्त दरात औषधे देण्याचा देशपांडे यांचा प्रयत्न आहे. भारतातील आरोग्य व्यवस्था रुग्णाच्या खिशाला परवडणारी आणि स्वस्त व किफायतशीर दरात मिळावी यासाठी अर्जुन देशपांडे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे देशभरातील आरोग्य व्यवस्था बळकट होईल व कमी दरात औषधे मिळाल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना मिळणार आहे. अर्जुन देशपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपांडे यांच्या कष्टप्रद व निष्ठावान कार्याची प्रशंसा करत केवळ २० वर्षांचा हा मुलगा ‘औषधनिर्माण क्षेत्रातील एक अद्भूत क्षमतेचा मुलगा’ असल्याचे प्रशस्तीपत्र दिले. अत्यंत लहान वयात अर्जुन देशपांडे यांनी देशातील तरुण उद्योजकांपुढे आपल्या कामाचा आदर्श ठेवला, या उद्योजकांना स्टार्ट अप व्यवसाय वृद्धीला लागणारी ऊर्जा व मार्ग उपलब्ध करून दिला. नोकऱ्या घेण्याचे नव्हे तर त्या निर्माण करण्याचे ध्येय दिले अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुन देशपांडे यांचे कौतुक केले. रुग्णांना स्वस्त दरात औषध पुरवठा करून देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या देशपांडे यांच्या कार्याचीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रशंसा केली.

कर्करोग झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना औषध उपचारांचा खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत खिशाला परवडतील अशा किमतीत औषधे उपलब्ध करून देण्याची ‘जेनेरिक आधार फार्मा क्रांती’ ही रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांना खराखुरा ‘आधार’च देत असल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले. देशाची आरोग्य व्यवस्था हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रातून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा रुग्णांना परवडणाऱ्या असाव्यात व यांचा लाभ गरजूंना व्हावा असे आपले स्वप्न असल्याचेही त्या म्हणाल्या. अर्जुन देशपांडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतात चालणाऱ्या ‘जेनेरिक आधार’च्या कामाबद्दल उत्सुकता प्रदर्शित केली.

या चर्चेत राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन देशपांडे यांच्या तळमळीने काम करण्याच्या वृत्तीची प्रशंसा केली. १४० कोटी जनतेला स्वस्त व किफायतशीर दरात औषधे देऊन देशाची आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला आपला हातभार लावत असल्याबद्दलही राष्ट्रपतींनी देशपांडे यांचे कौतुक केले. देशातील शेकडो लघु उद्योजकांचे सबलीकरण व स्वस्त-किफायतीशीर दरात औषध विक्रीतून देशपांडे यांनी ५ ट्रिलियन डॉलर उद्दिष्ट असलेल्या भारतीय व्यवस्थेला हातभार लावला याचा राष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला व देशपांडे यांची प्रशंसा केली. अर्जुन देशपांडे यांचे कार्य देशातल्या लाखो तरुणांना ऊर्जा देईल, त्यातून देशाच्या प्रगतीचा मार्ग विस्तारणारे लाखो उद्योजक जन्मास येतील असा विश्वासही राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ‘जेनेरिक आधार’चे संस्थापक व सीईओ अर्जुन देशपांडे म्हणाले की, “सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून जेनेरिक आधार कार्याची प्रशंसा ऐकणे हा आमच्यासाठी एक सन्मान आहे. आमच्या संस्थेकडून देशभरात २००० हून अधिक औषध दुकाने चालवली जात असून येत्या दीडेक वर्षांत देशभरातला औषध दुकानांचा आमचा आकडा १०,००० पर्यंत जाईल. देशातील १४० कोटी जनतेला स्वस्त व किफायतशीर दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ‘जेनेरिक आधार’चे आहे. गेल्या ३ वर्षांत आम्ही देशातील महानगरांपासून सुदूर, दुर्गम भागात स्वस्त दरातील औषधे पुरवण्यात यशस्वी ठरलो. आमच्या प्रयत्नांचा उद्देश रुग्णांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात औषध देण्याचा आहे.

देशातील आरोग्य व्यवस्था सर्वसामान्यांसाठी कमी खर्चाची, खिशाला परवडणारी असावी असे स्वप्न आमचे मार्गदर्शक रतन टाटा यांचे आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी लागणारा पाठिंबा व प्रोत्साहन राष्ट्रपतींकडून मिळाले आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे औषधे केवळ श्रीमंतांना परवडतात हा समज दूर करून देशातल्या सर्वसामान्याला स्वस्त व किफायतशीर दरात औषधे मिळतील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अर्जुन देशपांडे यांची ‘जेनेरिक आधार’ही एक फार्मास्युटिकल कंपनी असून भारतातील सर्वसामान्य रुग्णाच्या आरोग्याला प्राधान्य देत त्याचा औषधोपचारांवरचा होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने ती कार्यरत आहे. त्यांच्या या प्रयत्नाने गरीब रुग्णांना कमी दरातील पण उच्चप्रतीची औषधे उपलब्ध होत असून भारतातील आरोग्य व्यवस्थाही सक्षम होताना दिसत आहे. जनतेची आरोग्य जीवनशैली अधिक समृद्ध व्हावी हा या संस्थेचा हेतू आहे.‘जेनेरिक आधार’चे स्वतःचे शाखाविस्ताराचे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल असून ते अत्यंत कमी गुंतवणूकीत रुग्णांना परवडतील अशा उच्च प्रतीच्या औषधांची विक्री करून नफा मिळवून देते. अर्जुन देशपांडे हे तरुण उद्योजक असून वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांच्या संकल्पनेतून ‘जेनेरिक आधार’ मॉडेल अस्तित्वात आले आहे. त्यांच्या या मॉडेलने फार्मास्युटिकल विश्वात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. ‘जेनेरिक आधार’च्या वैशिष्ट्यपूर्ण फ्रँचायझी मॉडेलमुळे औषधाच्या मूळ किमतीत ८० टक्के सवलत देता येते व त्याचा फायदा भारतातील १४० कोटी जनतेला मिळतो. या फ्रँचायझी मॉडेलचा फायदा देशातील महिला सक्षमीकरण प्रयत्नांतही होताना दिसत आहे. यातून अनेक महिला उद्योजक जन्माला आल्या आहेत.

कोण आहेत अर्जुन देशपांडे 

अर्जुन देशपांडे यांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरूवात ते १६ वर्षांचे असतानाच एका प्रसंगामुळे झाली. एके दिवशी एक ज्येष्ठ व्यक्ती आपल्या कर्करोगग्रस्त पत्नीचे औषध घेण्यासाठी मेडिकल दुकानात आली होती. या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने आणि कर्करोगाची औषधे अत्यंत महाग असल्याने त्यांनी मेडिकल दुकानदाराकडे उधारीवर औषधे मागितली. हा प्रसंग पाहिल्यानंतर अर्जुन देशपांडे यांचे मन हळहळले व त्यातून यांच्या मनात ‘जेनेरिक आधार’ कल्पना घोळू लागली. पुढे त्यांनी अत्यंत परिश्रमातून ‘जेनेरिक आधार’चे बिझनेस मॉडेल उभे केले. ‘जेनेरिक आधार’च्या माध्यमातून मिळणारी औषधे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते अरुणाचल प्रदेश अशी सर्वत्र मिळतात. १३० कोटी जनतेला स्वस्त व किफायतशीर दरात औषधे मिळवून देणे हे अर्जुन देशपांडे यांच्या ‘जेनेरिक आधार’चे प्रमुख उद्दिष्ट व मिशन आहे.

हे ही वाचा : 

पोलीसांनी अटक केलेला रॅपर राज मुंगासे आहे कुठे? जितेंद्र आव्हाडांची ट्विटद्वारे मागणी

“काका मला वाचवा” म्हणतं उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला – प्रवक्ते नरेश म्हस्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss