श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची : अतुल लोंढेंचा आरोप

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे. हे देशाच्या हिताचे नाही.

श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची : अतुल लोंढेंचा आरोप

मुंबई : केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे. हे देशाच्या हिताचे नाही. सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलली नाहीत तर देशातील परिस्थिती स्फोटक बनण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, “पेट्रोल-डिझेलने १०० रुपयांचा टप्पा कधीच पार केला आहे. ही महागाई सातत्याने वाढतच आहे आणि सामान्य माणूस या महागाईच्या ओझ्याखाली दबला जात आहे. परंतु सरकार मात्र महागाईच्या आकडेवारीमध्ये जगलरी करुन यातून काही वाचता येईल का याचा प्रयत्न करत आहे. अन्नधान्याचे काही आकडे कमी करून महागाई दर कमी आला असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील चार-पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. नागपूरसारख्या शहरात ४१० रुपयांचा गॅस सिलिंडर ११०० रुपयांना झाला आहे, खाद्यतेल ७० रुपयांवरून २०० रुपये झाले, भाजीपाला महाग झाला आहे, सीएनजी ३६ रुपयांवरून ९० रुपये झाला. सरकार आकड्यांचा खेळ करून आभासी चित्र दाखवू शकते पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. असे अतुल लोंढे यांनी म्हटले.

हिंदू-मुसलमान सारखे धार्मिक विषय पुढे करून जीवनावश्यक विषय दाबून ठेवले तर आपल्याला ते महाग पडेल यात दुमत असण्याचे कारण नाही. केंद्रातील सरकारच्या चुकीचा धोरणांचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे त्यांनी वेळीच लक्ष द्यावे अन्यथा गंभीर परिणाम दिसतील, असे लोंढे म्हणाले.

हेही वाचा : 

जान्हवी कपूरच्या गुड लक जेरी चा ट्रेलर प्रदर्शित

Exit mobile version