बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मोठी बातमी समोर येत असून अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजत असली तरी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे.
आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून तळोजा कारागृहातून ठाणे येथे नेले जात होते. यादरम्यान आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावली. आरोपीने बंदुकीतून तीन राउंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या दरम्यान झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा येथील शासकीय रुग्णालयात आणले गेले असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
आधी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजले होते. परंतु आत नवीन माहिती मिळत असून पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, याप्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात येत आहे.