Badlapur School Case: मी एक बाप आहे अन् त्या ठिकाणी माझी मुलगी असती तर? Jitendra Awhad

Badlapur School Case: मी एक बाप आहे अन् त्या ठिकाणी माझी मुलगी असती तर? Jitendra Awhad

बदलापूर येथील घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूर मधील आदर्श विद्यालयात दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी (२० ऑगस्ट) नागरिकांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले होते. नागरिकांनी मंगळवारी (२० ऑगस्ट) शहरात बंदची हाक दिली होती. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर जाऊन रेल रोको केला. सुमारे १० तास बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. तसेच नागरिकांनी शाळेचा गेट तोडून तोडफोड केली. दगडफेकीमुळे आंदोलनाने हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढले. या प्रकरणावरून राजकीय वातावरणदेखील आता तापले आहे. अश्यातच आता राज्यामधील शाळांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्रा आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, “आज अनेक शाळांची माहिती घेतली तेव्हा समजले की, बहुतांश शाळांमध्ये आई किंवा वडील आपापल्या मुलींना शाळेतून घेण्यासाठी आले होते. शाळा प्रशासनाच्या भरवश्यावर सोडायला पालक तयार नाहीत. एवढी अस्वस्थता आणि घबराट या एका बदलापूरमुळे पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. हे घबराटीचे वातावरण महाराष्ट्रासाठी चांगले नाही. आपण पालकांचा विश्वास टिकवण्यात कमी पडलो, हे सत्ताधाऱ्यांनी आता समजून घेतले पाहिजे अन् हा विश्वास परत मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आईवडील कामावर असतील तर आपली मुलगी घरी परत येत नाही, तोपर्यंत त्यांच्या जीवात जीव रहात नाही.”

ते पुढे म्हणाले, “बदलापूर घटनेतील तो विकृत प्रकार कुठे घडला, हे विचारण्यासाठी त्या चिमुरड्यांना घटनास्थळी नेण्यात आले. हा प्रकार म्हणजे नालायक अन् विकृत प्रवृत्तीचा कळसच आहे. त्या मुलींवर झालेला मानसिक आघात त्यांना पुढे २० वर्षे सतावणार आहे. कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाशी बोला, ते सांगतील की या मुली तो प्रकार विसरणार नाहीत. समाजात त्या गेल्या की अस्वस्थ होतील ; घाबरतील ! मी काही मानसोपचारतज्ज्ञांशी बोललो तर त्यांनी सांगितले की, या मुलींना पुढील पाच वर्षे प्रचंड सांभाळून घ्यावे लागेल. हे सर्व राजकारण म्हणून बोलत नाही. तर, एक बाप म्हणून बोलतोय. राजकारण म्हणून नाही. पण, मी एक बाप आहे; अन् त्या ठिकाणी माझी मुलगी असती तर? म्हणूनच आता या मुलींची जबाबदारी सरकारची आहे. त्यांना सांभाळले पाहिजेच !!”

हे ही वाचा:

MPSC Pune Protest: एमपीएससी आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा विजय पण आंदोलन अद्याप कायम; Rohit Pawar यांचे ट्विट चर्चेत

Badlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पडली पार सुनावणी; हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले खडे बोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version