आपात्कालीन साखळीमुळे बिघडतंय मध्य रेल्वेचे वेळापत्रक

४ ते १७ जुलैच्या दरम्यान मध्य रेल्वेने मुंबई विभागात विनाकारण आपातकालीन साखळी खेचल्याच्या एकूण १२० प्रकरणांची नोंद केली आहे आणि यापैकी जवळपास ७१ जणांवर दंडात्मक कारवाई मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

आपात्कालीन साखळीमुळे बिघडतंय मध्य रेल्वेचे वेळापत्रक

मुंबईची लाईफ लाईन म्हणून प्रसिद्ध असलेली रेल्वे ही पावसाळा सुरू झाला की काही संत गतीने चालायला लागते पण रेल्वेतल्या होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा पावसाळ्यामुळे रेल्वे उशिरा येणं याची आपल्या सर्वांना सवय मात्र आपात्कालीन साखळीमुळे रेल्वे उशिरा येण्याचा कारण जरा अजबच वाटतं पण हे कारण अगदीच खरं आहे. कारण विनाकारण आपत्कालीन साखळी प्रवाशांनी खेचल्यामुळे, आता हीच आपत्कालीन साखळी मध्य रेल्वेसाठी एक डोकेदुखी बनून राहिली आहे. ४ ते १७ जुलैच्या दरम्यान मध्य रेल्वेने मुंबई विभागात विनाकारण आपातकालीन साखळी खेचल्याच्या एकूण १२० प्रकरणांची नोंद केली आहे आणि यापैकी जवळपास ७१ जणांवर दंडात्मक कारवाई मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

आपात्कालीन साखळी ही संकटाच्या काळात रेल्वे थांबवण्यासाठीची किंवा रेल्वेमधून बाहेर पडता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने केलेली एक तरतूद आहे. पण सध्या जर मध्यरेल्वेच्या प्रवाशांनी रेल्वेची ही आपत्कालीन साखळी खेचण्याची कारणे पाहिले तर,गाडीचा थांबा नसलेल्या ठिकाणी उतरण्यासाठी, सहप्रवाशाला झालेला विलंब, फलाटावरच थांबणं, फलाटावर सामान विसरणं, गाडीतून मोबाईल खाली पडणं अपंगांच्या डब्यात अन्य प्रवाशांचा प्रवास अशा विविध शुल्लक कारणांसाठी ही साखळी खेचण्याचे प्रकार होत आहेत आणि साखळी खेचल्यानंतर गाडी पुन्हा सुरू होण्यासाठी किमान दहा मिनिटे लागत असल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक सातत्याने बदलत आहे.

साखळी खेचल्यावर नक्की काय शिक्षा होते?

कोणत्याही गंभीर कारणाशिवाय प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातील आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवल्यास रेल्वे अधिनियमातील १४१ व्या कलमाचा भंग होतो. विनाकारण आपातकालीन साखळी खेचणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेऊन रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात येते. तेथे त्यांना ५०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किंवा एका वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

आतापर्यंत मध्य रेल्वेने जुलैमध्ये कारवाई करून एकूण ४२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वे वरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, एलटीटी, ठाणे, कल्याण यांसह अन्य स्थानकात या घटना सातत्याने घडत आहे.

 

Exit mobile version