मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबईत दुकाने आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. हॉटेल मालकांच्या संघटनेने न्यायालयात मुदतवाढीसाठी केलेल्या याचिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

उच्च न्यायालयात मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुकाने आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. हॉटेल मालकांच्या संघटनेने न्यायालयात मुदतवाढीसाठी केलेल्या याचिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुकाने व आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी म्हणून इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावयास सांगितल्यानंतर संबंधित विभागाकडून तीन महिन्याच्या मुदतवाढीसाठीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे पाठवण्यात आला होता. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली होती. त्यावेळी दुकाने व आस्थापनांवर लावण्यात येणाऱ्या मराठी पाट्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वकील धृती कपाडिया यांनी न्यायालयात दिली होती.

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व दुकाने व आस्थापनांना 31 मे पर्यंत मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. या मराठी पाट्या लावण्याबाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा कालावधी जरी नमूद केला गेला नसला, तरी तो वृत्तपत्रात जाहीरात देऊन स्पष्ट करण्यात आला होता. दिलेल्या मुदतीत मराठी पाट्या जर दुकाने व आस्थापनांवर लावण्यात आल्या नाही तर अशा व्यापाऱ्यांकडून किंवा आस्थापनांकडून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येण्याचे सांगण्यात आले होते. पण आलेल्या नियमानुसार पाट्यांवरील भाषा, आकार आणि भाषेचा क्रम बदलण्याकरिता खूप वेळ लागू शकतो व तसेच या गोष्टीकरिता खूप खर्चही करावा लागणार आहे असे अनेक व्यापाऱ्यांचे मत होते. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी संघटनेने केली होती.

 

Exit mobile version