कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे उर्वरित जंबो कोविड सेंटर बंद होण्याची शक्यता

गेल्या 21 दिवसांमध्ये कोविड रुग्णांमध्ये पाच पट घट झाली आहे. एक जुलै रोजी शहरात कोरोनाचे ९७१० सक्रिय रुग्ण होते. मात्र, गुरुवारी हा आकडा १९३७ वर घसरला आहे.

कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे उर्वरित जंबो कोविड सेंटर बंद होण्याची शक्यता

मुंबई: हल्लीच्या काळात कोविडचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. सध्या मुंबईत दररोज कोविड – १९ चे जवळपास २०० रुग्ण सापडत असून बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स, मालाड आणि कांजूरमार्ग या तीन ठिकाणी मुंबईत जंबो कोविड सेंटर सुरू आहेत. पण, कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या विलक्षण घटीमुळे मुंबई महानगरपालिका हे तिन्ही जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्यामुळे या जंबो कोविड सेंटर मध्ये म्हणावे तेवढे रुग्ण येत नसल्यामुळे ही सेंटर सुरू ठेवणं आता कठीण जात आहे. एका अंदाजानुसार एक जंबो कोविड सेंटर चालवण्यास जवळपास तीन कोटी इतका मासिक खर्च येतो.

कोरोनाची परिस्थिती सुधारल्यामुळे मुंबई महानगरपालिका सध्या मुंबईत सुरू असणारे जंबो कोविड सेंटर बंद करून, या कोविड सेंटरमधील वैद्यकीय उपकरणे रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा विचार महानगरपालिका करत आहे. “आम्ही उर्वरित केंद्र बंद करण्याचा विचार करत आहोत. परंतु, यापूर्वी कोविड टास्क फोर्सशी बोलणे आवश्यक आहे” मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांचे म्हणणे आहे.

गेल्या 21 दिवसांमध्ये कोविड रुग्णांमध्ये पाच पट घट झाली आहे. एक जुलै रोजी शहरात कोरोनाचे ९७१० सक्रिय रुग्ण होते. मात्र, गुरुवारी हा आकडा १९३७ वर घसरला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत दररोज २०० ते ३०० च्या दरम्यान कोरोना रुग्ण सापडत होते. जिथे  जुलैच्या पहिल्या आठवड्यात ७०० च्या वर रुग्ण सापडत होते.

मार्चमध्ये मुंबई महानगरपालिकेने दहिसर आणि मुलुंडमधील इतर केंद्र बंद केली होती. गोरेगाव मधील ३७०० बेड असलेले सर्वात मोठे जंबो सेंटर म्हणजेच नेस्को जंबो कोविड सेंटर १८ जुलै रोजी बंद करण्यात आले आहे.

 

Exit mobile version